पुणे :



महापालिका निवडणुकीदरम्यान विविध मतदान केंद्रांवर बोगस मतदान, मतदारयादीतील त्रुटी आणि दुबार मतदारांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुणे आणि मुंबई या दोन्ही शहरांत मतदानाच्या प्रक्रियेत गंभीर अनियमितता समोर आल्याने निवडणूक यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पुण्यातील वानवडी परिसरातील सनग्रेस स्कूल येथील मतदान केंद्रावर मूळच्या बिहारच्या चार महिलांनी बोगस मतदान केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. तसेच जनवाडी परिसरातील वीर बाजीप्रभू विद्यालय मतदान केंद्रावरही अशाच स्वरूपाचे प्रकार घडल्याचा दावा करण्यात येत आहे. या घटनांमुळे मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत शंका व्यक्त होत आहेत.
दुबार नाव आढळल्यास मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख दोन पुराव्यांच्या आधारे तपासली जाईल आणि एकाच ठिकाणी मतदान करण्याचे हमीपत्र घेतले जाईल, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्यात आले असले तरी मतदारयादीतील या गोंधळामुळे निवडणूक प्रक्रियेवर सावली पडली असल्याची भावना मतदारांत व्यक्त होत आहे.

















