पुणे :



नवले पुल परिसरातील वाढत्या अपघातांच्या घटनांचा गंभीर मुद्दा खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत उपस्थित केला. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाल्यानंतर या विषयाकडे पुन्हा लक्ष वेधण्यात आले. यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि भूपृष्ठ विकास मंत्री नितीन गडकरी यांनी प्रत्यक्ष प्रतिसाद देत महत्त्वपूर्ण माहिती दिली.
* सुप्रिया सुळे यांची मागणी
कोल्हापूर–पुणे मार्गावरील नऱ्हे परिसरात वारंवार अपघात होत असल्याने हा प्रश्न तातडीने सोडवण्याची गरज असल्याचे सुळे यांनी सांगितले.
“आपण दिल्लीतून पथक पाठवले, काही अपघातांचे प्रमाण कमी झाले; तरीही ही दुर्घटना सुरूच आहेत. कंत्राटदारांना काळ्या यादीतही टाकले, मात्र काम पूर्ण कधी होणार? नऱ्हे भागात शून्य अपघात कसे साध्य होणार?” असा थेट सवाल त्यांनी गडकरींना केला.
* गडकरींचे उत्तर

“पुणे–कोल्हापूर हा राष्ट्रीय महामार्ग अत्यंत महत्त्वाचा असून पुणे–सातारा हा टप्पा रिलायन्सकडे होता. ते कंत्राट रद्द केले आहे. अभ्यास समिती नेमली असून वेस्टर्न बायपासच्या संदर्भातही काम सुरू आहे. सहा हजार कोटींचा डीपीआर मंजूर करण्यात आला आहे. खंबाटकी घाटातील बोगद्यांचे काम सुरू असून सातारा–कोल्हापूर टप्प्यावरील अडचणी दूर करण्यासाठी बैठक घेण्यात येणार आहे,” असे गडकरी यांनी सांगितले.

















