पावसाळ्याच्या तोंडावर महापालिकेची सज्जता; ‘आपदा मित्र’ पथकांची नियुक्ती, पूरप्रवण भागांत विशेष उपाययोजना

पुणे :

शहरात पावसाळ्यात नदीपात्रात पाणी सोडले जाणे आणि मुसळधार पावसामुळे निचरा न झाल्यास अनेक भागांत अचानक पूरस्थिती निर्माण होते. या पार्श्वभूमीवर यंदा महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेतला असून तातडीच्या मदतीसाठी ‘आपदा मित्र’ या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
राज्यशासनाच्या सूचनेनुसार ही नियुक्ती केली जाणार असून महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून याबाबतची माहिती देण्यात आली. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापौर मंजुषा नागपुरे यांनी संबंधित विभागांची आढावा बैठक घेतली. यावेळी प्रभाग व क्षेत्रीय स्तरावर सूक्ष्म नियोजन करून आपत्ती निवारण यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे निर्देश देण्यात आले.
पूर व्यवस्थापनासाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देत प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात स्वतंत्र आपत्ती निवारण पथके स्थापन करण्यात येणार आहेत. या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलामार्फत विशेष प्रशिक्षण देण्यात येईल. गेल्या वर्षी ४० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते; मात्र यंदा प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी १० प्रमाणे एकूण १५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. हे कर्मचारी तीन महिन्यांच्या कालावधीत २४ तास सज्ज राहणार आहेत.
बैठकीत महापौरांनी पूरप्रवण भागांत सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे, पावसाळी वाहिन्यांचे मॅपिंग पूर्ण करणे, नाल्यांच्या आराखड्यात सुधारणा करणे तसेच रिटेनिंग वॉलची अपूर्ण कामे तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, महामेट्रो, महावितरण, पीएमआरडीए आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांची संयुक्त बैठक घेऊन समन्वय साधण्याचे निर्देशही देण्यात आले.
समाविष्ट गावांसाठी स्वतंत्र पूर व्यवस्थापन मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन निधीतून सुरू असलेली कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश देत यंदा पावसाळ्यात नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिका यंत्रणा सज्ज असल्याचा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.

आणखी वाचा   शस्त्रक्रियेत निष्काळजीपणा हृदयरोगतज्ज्ञावर गुन्हा दाखल