कडक बंदोबस्तात परीक्षा; कॉपी रोखण्यासाठी २७१ भरारी पथके तैनात



पुणे :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता दहावीची राज्य मंडळाची परीक्षा उद्या, २० फेब्रुवारीपासून सुरू होत असून १८ मार्चपर्यंत ती चालणार आहे. यंदा राज्यभरातून एकूण १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा ३ हजार ८७९ विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे. यामध्ये ८ लाख ६५ हजार ७४० मुलगे, ७ लाख ४९ हजार ७३६ मुली आणि १५ तृतीयपंथी विद्यार्थी सहभागी होत आहेत. नियमित शाळांमधील १५ लाख ५६ हजार ५९४ तर खासगी २९ हजार ३०१ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.
५,१११ परीक्षा केंद्रांवर व्यवस्था
राज्यातील २३ हजार ६८३ शाळांतील विद्यार्थी ५ हजार १११ परीक्षा केंद्रांवर परीक्षा देतील. मागील वर्षी ५,१३० केंद्रे होती; मात्र गैरप्रकार आढळलेल्या ३१ केंद्रांवर कारवाई करून ती रद्द करण्यात आली आहेत. पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, नाशिक आदी नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे.
सकाळच्या सत्रातील परीक्षा साडेदहा वाजता, तर दुपारच्या सत्रातील परीक्षा अडीच वाजता सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांनी किमान अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर हजर राहण्याच्या सूचना मंडळाने दिल्या आहेत. यंदाही प्रत्येक पेपरसाठी अतिरिक्त १० मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे. अधिकृत वेळापत्रकच ग्राह्य धरण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.
कॉपी रोखण्यासाठी कडक उपाययोजना
बारावीच्या परीक्षेत घडलेल्या सामूहिक कॉपीच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावीच्या परीक्षेत विशेष दक्षता घेण्यात आली आहे. राज्यभरात २७१ भरारी पथके, विभागीय विशेष पथके तसेच केंद्रस्तरीय देखरेख पथके कार्यरत राहणार आहेत. संवेदनशील केंद्रांवर पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
पालकांची भूमिका महत्त्वाची
परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांवर अनावश्यक ताण येऊ नये, यासाठी पालकांनी सकारात्मक वातावरण ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेशपत्र, ओळखपत्र व आवश्यक लेखनसाहित्य सोबत ठेवणे बंधनकारक आहे. मोबाईल, कॅल्क्युलेटर किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक साधने परीक्षा केंद्रात नेण्यास मनाई आहे. परीक्षा केंद्राच्या ५०० मीटर परिसरातील झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा
राज्यातील ९ हजार ७८८ दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वैद्यकीय कारणास्तव आवश्यक सवलती देण्यात येणार आहेत.
आरोग्याची काळजी घेऊन, शांतचित्ताने आणि आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी, असे आवाहन मंडळाकडून विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा निर्णय करणाऱ्या या परीक्षेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
















