जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुका पुन्हा लांबणीवर



पुणे –
राज्यात नगर परिषदांच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा तातडीने होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र प्रत्यक्षात या निवडणुकांचा मार्ग अजूनही मोकळा झालेला नसून, घोषणा होण्यासाठी किमान पंधरा दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता थेट नवीन वर्षातच जाहीर होण्याची शक्यता बळावली आहे.
प्रशासकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी २४ डिसेंबरपर्यंत जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा होईल, असा अंदाज होता. मात्र सध्याच्या घडीला ही प्रक्रिया किमान दोन आठवडे पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यात जानेवारी महिन्याच्या मध्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांमुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांना प्राधान्य मिळण्याची शक्यता कमी असल्याचे चित्र आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीपूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका घेण्याचे निर्देश दिले असले तरी, अद्याप कोणतेही अधिकृत वेळापत्रक जाहीर झालेले नाही. त्यामुळे या निवडणुका वेळेत होतील का, याबाबत साशंकता कायम आहे.

















