कादंबरी असते समाजाचा विस्तृत जीवनपट- .वि.दा. पिंगळे

पुणे-

साहित्यिक कट्टा वारजे व ज्येष्ठ नागरिक सामाजिक प्रतिष्ठान वारजे पुणे आयोजित प्राचार्य डॉ. रमेश जलतारे लिखित अंतहीन आकाश  या कादंबरीचे प्रकाशन प्रसिद्ध साहित्यिक व वक्ते वि.दा. पिंगळे यांच्या हस्ते संपन्न झाले. ह्याप्रसंगी बोलताना ते असे म्हणाले, कादंबरी हा समाजाचा एक विस्तृत व विशाल असा जीवनपट असतो. कविता व कथेपेक्षा लेखकाला समाजाचे  विविध  प्रश्न मुक्तपणाने मांडता येतात . अंतहीन आकाश  या कादंबरीमध्ये देखील मध्यमवर्गीय समाजाची होणारी ससेहोलपट, त्यांचा विविध प्रश्नांसाठीचा संघर्ष त्यात मुलांचे शिक्षण ,भविष्य, आरोग्य आणि पैशांची ओढाताण यामुळे मध्यमवर्गीय माणूस आपले आयुष्य अंतहीन प्रश्नांचे आकाश समजूनच जगत असतो. ही सामाजिकता अतिशय मार्मिकपणे व स्पष्टपणे डॉ. रमेश जलतारे यांनी या कादंबरीतून मांडलेली आहे. रमेश जलतारे हे कवी , लेखक आणि समाजचिंतक आहेत .समाजाचे समकालीन मूल्य पकडून त्यावर प्रखळपणे ते भाष्य करतात. या कादंबरीमध्ये देखील त्यांनी व्यवस्थेला अनेक प्रश्न विचारलेले आहेत . रघुनाथराव हे या कादंबरीतले मुख्य पात्र आहेत .मुंबईत एका चाळीत राहणारे ते आपला संसार कसा ओढतात, काय काय संघर्ष त्यांना करावा लागतो आणि  शेवटी हाती काय लागते याचे उत्तम चित्रण या कादंबरीमध्ये आहे. वाचकांना निश्चित ही कादंबरी खेळवून ठेवते हे या कादंबरीचे मोठे यश आहे. खूप दिवसांनी एक चांगली कादंबरी वाचायला मिळाली याचे समाधान देखील वि.दा. पिंगळे यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी महाकवी कालिदास प्रतिष्ठानचे अध्यक्ष वि.ग. सातपुते, उपाध्यक्ष डॉ.महेंद्र ठाकूरदास, वारजे साहित्य कट्ट्याचे अध्यक्ष ,माजी नगरसेवक बाबा उर्फ प्रदीप धुमाळ, पुणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपालीताई धुमाळ, वारजे साहित्य कट्ट्याचे सचिव डी. के. जोशी, स्वयंप्रकाशनाचे प्रकाशक शुभानंन चिंचकर ,प्राचार्य नंदकिशोर बोदाई ,एकता मासिकेच्या संपादक रूपाली भुसारी असे अनेक मान्यवर उपस्थित होते. मा.डि.के. जोशी यांनी प्रास्ताविक व्यक्त केले . 

आणखी वाचा   पुणे महापालिका निवडणूक : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून उमेदवारी अर्ज विक्रीला सुरुवात