पुणे :



राज्यात जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची घोषणा झाल्याने ग्रामीण राजकारणात हालचालींना वेग आला असून पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. पुणे जिल्ह्यात एकूण ७३ गट व १४६ गणांसाठी ही निवडणूक होणार असून तब्बल २९ लाख ७६ हजार ४५४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार १६ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. ५ फेब्रुवारी रोजी मतदान होईल, तर ७ फेब्रुवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १३ही तालुक्यांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
जिल्ह्यातील गट रचनेनुसार अनुसूचित जातीसाठी ७, अनुसूचित जमातीसाठी ५, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी १६, तर ४२ गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी असतील. गण रचनेत अनुसूचित जातीसाठी १५, अनुसूचित जमातीसाठी ८, मागास प्रवर्गासाठी ३४, तर सर्वसाधारण ८९ गणांचा समावेश आहे. सर्वाधिक प्रत्येकी १६ गण जुन्नर, खेड व इंदापूर तालुक्यांत असून शिरूर व दौंड तालुक्यांत प्रत्येकी १४ गण आहेत. हवेली व बारामतीत १२, आंबेगाव व मावळमध्ये १०, पुरंदरमध्ये ८, मुळशीमध्ये ६, तर वेल्ह्यात सर्वात कमी ४ गण आहेत.
मतदारसंख्येच्या दृष्टीने इंदापूर तालुका आघाडीवर असून येथे ३ लाख २१ हजारांहून अधिक मतदार आहेत. त्यापाठोपाठ जुन्नर तालुक्यात सुमारे ३ लाख ७ हजार, तर शिरूर तालुक्यात ३ लाख १ हजारांहून अधिक मतदार मतदानासाठी पात्र ठरणार आहेत. जिल्ह्यातील मतदारांमध्ये १५ लाख २६ हजार ९८६ पुरुष, १४ लाख ४९ हजार ३७३ महिला व ९५ इतर मतदारांचा समावेश आहे.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्ह्यात ३ हजार ६०५ मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. त्यासाठी ७ हजार ९३१ ईव्हीएम व ३ हजार ९६६ कंट्रोल युनिट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. निवडणुकीसाठी एकूण २३ हजार ५४५ अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले असून प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्राध्यक्षांसह मतदान अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत.
दरम्यान, सर्व तालुक्यांतील अर्ज स्वीकृती, छाननी तसेच मतमोजणीची ठिकाणे प्रशासनाने जाहीर केली असून निवडणूक प्रक्रिया शांततेत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
















