पुणे :



पुणे शहरात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्याच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी पुणे महानगरपालिकेची निवडणूक सध्या सर्वच प्रमुख पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरली आहे. सत्ताधारी आघाडीतील तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्याने संघर्ष अधिक तीव्र झाला असून, प्रचाराच्या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या व्हिडीओत भाजपच्या एका महिला उमेदवाराच्या पतीचा बारमध्ये नाचतानाचा प्रकार दाखवण्यात आल्याचा दावा धंगेकर यांनी केला आहे. व्हिडीओसोबतच त्यांनी गंभीर आरोप करत शिवाजीनगर मतदारसंघातील आमदारांचे आर्थिक व्यवहार हे संबंधित व्यक्ती पाहत असल्याचेही म्हटले आहे.
धंगेकर यांनी या माध्यमातून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली आहे. तसेच आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचे नाव न घेता, डान्सबारमधील एका व्यक्तीसोबतचा फोटोही त्यांनी शेअर केला आहे. यामुळे राजकीय वाद अधिक चिघळला आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना धंगेकर यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. उमेदवार निवडताना चारित्र्य आणि नैतिकतेचा विचार केला जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. महापालिकेच्या टेंडरमधून मिळालेला पैसा जर प्रचार करणारे लोक डान्सबारमध्ये खर्च करत असतील, तर अशा उमेदवारांकडून जनतेने काय अपेक्षा ठेवायची, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
प्रभाग क्रमांक १२ मधील भाजपच्या एका महिला उमेदवाराच्या पतीचा असाच व्हिडीओ व्हायरल झाल्याचा उल्लेख करत, संस्कृती आणि मूल्यांची भाषा करणाऱ्या नेत्यांनी या प्रकरणावर खुलासा करावा, अशी मागणी धंगेकर यांनी केली आहे. या आरोपांमुळे पुणे महापालिका निवडणुकीतील राजकीय तापमान आणखी वाढले असून, पुढील काही दिवसांत हा वाद अधिक रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
















