पुणे :



पुणे आणि दौंडदरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची दिलासादायक बातमी आहे. दौंड कॉर्ड लाईनवरील दुसऱ्या प्लॅटफॉर्मचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच तो प्रवाशांसाठी खुला होणार आहे. या नव्या प्लॅटफॉर्ममुळे पुणे, मनमाड, दिल्ली आणि हावडा मार्गावरील रेल्वे वाहतूक अधिक वेगवान आणि सोयीस्कर होणार आहे.
सध्या या कॉर्ड लाईनवर एकाच प्लॅटफॉर्मवरून सर्व गाड्यांची ये-जा होत असल्याने अनेकदा क्रॉसिंगसाठी गाड्यांना थांबावे लागत होते. परिणामी प्रवासाचा वेळ वाढत होता आणि प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागत होता. दुसरा प्लॅटफॉर्म सुरू झाल्यानंतर ही अडचण दूर होणार असून, गाड्यांच्या थांब्यांची संख्या कमी होईल. त्यामुळे प्रवासाचा कालावधी सरासरी १५ ते २० मिनिटांनी कमी होईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
दौंड कॉर्ड लाईनला रेल्वे नेटवर्कमध्ये विशेष महत्त्व आहे. २०२० मध्ये ही लाईन सुरू झाल्यानंतर अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांना दौंड जंक्शनवर जाऊन इंजिन बदलण्याची गरज उरलेली नाही. त्यामुळे वेळेची बचत होत आहे. मात्र, एकाच प्लॅटफॉर्ममुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी ही मोठी अडचण ठरत होती. आता दौंड ते काष्टी दरम्यानचे दुहेरीकरण जवळपास पूर्णत्वास येत असून, नवीन प्लॅटफॉर्ममुळे ही समस्या कायमची सुटणार आहे.
रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून येत्या १५ दिवसांत या मार्गाची व नव्या प्लॅटफॉर्मची तपासणी होणार आहे. मंजुरी मिळाल्यानंतर प्रवाशांसाठी हा प्लॅटफॉर्म सुरू केला जाईल. प्रारंभी गाड्यांच्या थांब्यांची व्यवस्था करण्यात येणार असून, त्यानंतर छत, पादचारी पूल व इतर सुविधांची कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जातील. या निर्णयामुळे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

















