पुणे :



पुणे महानगरपालिकेच्या १६५ जागांसाठी उद्या, गुरुवार (१५ जानेवारी) रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण तापले असून, प्रशासन आणि निवडणूक यंत्रणा पूर्णतः सज्ज झाली आहे. मतदान शांततेत आणि सुरळीत पार पडावे, यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी शहरातील प्रमुख रस्त्यांवर कडक वाहतूक निर्बंध लागू केले आहेत.
मतदानाच्या दिवशी तसेच त्यानंतरच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे निर्बंध १५ आणि १६ जानेवारी या कालावधीत लागू राहणार असून, सकाळी ६ ते सायंकाळी ७ या वेळेत अनेक महत्त्वाचे मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. विशेषतः जड वाहने आणि खाजगी वाहनांना काही संवेदनशील भागांत प्रवेशास मनाई करण्यात आली आहे.
हडपसर, कोरेगाव पार्कमध्ये कडक नियम
हडपसर परिसरात मतदान केंद्रांची संख्या अधिक असल्याने साने गुरुजी परिसराकडे जाणारे मार्ग तात्पुरते बंद राहतील. वाहनचालकांनी माळवाडी डी.पी. रस्ता तसेच अमरधाम स्मशानभूमी मार्गाचा पर्याय वापरावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कोरेगाव पार्क भागात व्हीआयपी हालचालींच्या पार्श्वभूमीवर नॉर्थ मेन रोड (लेन ‘सी’) आणि बंडगार्डन घाट परिसरातील वाहतूक बंद राहणार आहे.
पेठा, विमाननगर व मध्यवर्ती भागात बदल
मध्यवर्ती पेठांमध्ये पॉवर हाऊस चौक, संत कबीर चौक आणि रामोशी गेट परिसरातील रस्ते बंद ठेवण्यात आले असून, वाहनांना क्वार्टर गेट आणि सेव्हन लव्हज चौक मार्गे वळवण्यात येणार आहे. विमाननगर भागात फिनिक्स मॉलच्या मागील बाजूस तसेच निको गार्डन परिसरात वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले असून, श्रीकृष्ण हॉटेल आणि दत्त मंदिर चौकातून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
शहराच्या मध्यभागात कडेकोट बंदोबस्त
पुरम चौक ते टिळक चौक दरम्यानची वाहतूक बंद ठेवण्यात आली असून, प्रवाशांनी शास्त्री रस्ता आणि दांडेकर पूल मार्गे प्रवास करावा. सारसबाग खाऊ गल्ली तसेच बाजीराव रस्त्यावरील सनस पुतळा परिसरातही वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.
दरम्यान, मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक नियमांचे पालन करावे व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

















