नवे चेहरे, तुटलेली युती आणि बंडखोरी

* महापालिका निवडणुकीत भाजपची कसोटी

पुणे :

महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपने धाडसी पण चर्चेचा निर्णय घेतला आहे. विसर्जित सभागृहातील तब्बल ३० ते ४० माजी नगरसेवकांना डावलत नव्या चेहऱ्यांना उमेदवारी देण्यात आल्याने पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे. त्याचवेळी शिंदेसेनेसोबत अपेक्षित असलेली युती प्रत्यक्षात न उतरल्याने भाजपची निवडणूक रणनीती अधिकच गुंतागुंतीची झाली आहे.
यंदाच्या निवडणुकीत चार सदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्यात आली असून, हीच रचना २०१७ मध्ये भाजपसाठी अत्यंत लाभदायक ठरली होती. त्या वेळी पक्षाला तब्बल ९९ जागांवर यश मिळाले होते. त्यामुळे याच प्रभागपद्धतीवर भाजपने पुन्हा एकदा मोठी अपेक्षा ठेवली होती. याच पार्श्वभूमीवर, माजी नगरसेवकांसह सुमारे अडीच हजार इच्छुकांनी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या.
मात्र, उमेदवारी जाहीर होताच अनेकांना धक्का बसला. दीर्घकाळ तयारी करणाऱ्या ३० ते ४० माजी नगरसेवकांचे तिकीट कापण्यात आले. यामध्ये महिला माजी नगरसेविकांची संख्या अधिक आहे. काही पुरुष माजी नगरसेवकांच्या बाबतीत त्यांच्या पत्नींना संधी देत नाराजी टाळण्याचा प्रयत्न करण्यात आला असला, तरी महिला नगरसेविकांच्या पतींना उमेदवारी न मिळाल्याने असंतोष वाढल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली शिंदेसेनेसोबतची युती प्रत्यक्षात साकार न झाल्याने राजकीय गणिते बिघडली आहेत. भाजपने सर्व १६५ जागांसाठी आपल्या इच्छुकांना एबी फॉर्म देत उमेदवारी अर्ज दाखल करून घेतले आहेत. त्याचवेळी शिंदेसेनेनेही स्वतंत्रपणे एबी फॉर्म वाटप सुरू केल्याने युतीचे भवितव्य अंधारात गेले आहे.
उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या काही माजी नगरसेवकांनी आणि इच्छुकांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) गाठत उमेदवारी मिळवली आहे. त्यामुळे भाजपने बंडखोरी टाळण्यासाठी केलेली खबरदारी कितपत यशस्वी ठरणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
नवे चेहरे मैदानात उतरवणे, जुने चेहरे डावलणे आणि संभाव्य युती अपयशी ठरणे—या सर्व घटकांचा भाजपला फायदा होणार की तोटाच सहन करावा लागणार, तसेच पक्ष सोडून गेलेल्यांचा फटका किती बसेल, याचे उत्तर महापालिका निवडणुकीच्या निकालानंतरच मिळणार आहे.

आणखी वाचा   पुणे शहर भाजप माध्यम कक्षाचे उद्घाटन संपन्न