अजित–शरद पवार गटातील गोंधळाचा कळस

* दोन्हीं राष्ट्रवादीची युतीची गणिते कोसळली

पुणे :

महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट आणि शरद पवार गटातील अंतर्गत तणाव उघडपणे समोर आला. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशीच दोन्ही गटांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
सूत्रांच्या माहितीनुसार, आयात उमेदवारांना प्राधान्य देत अजित पवार गटाने मोठ्या प्रमाणावर घड्याळ चिन्हावर उमेदवार जाहीर केल्याने शरद पवार गटातील इच्छुकांची अडचण वाढली. आधी ठरलेल्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्याला हरताळ फासल्याचा आरोप शरद पवार गटातील नेत्यांनी केला आहे.
या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाने शेवटच्या क्षणी आक्रमक भूमिका घेत प्रत्येक प्रभागातील इच्छुकांना एबी फॉर्म देत अर्ज दाखल करण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे अनेक ठिकाणी एकाच गटातील एकापेक्षा अधिक उमेदवार अर्ज भरण्याच्या रांगेत उभे राहिल्याचे चित्र दिसून आले.
दरम्यान, निवडणुकीपूर्व काळात महाविकास आघाडी सोडून अजित पवार गटाशी जवळीक साधणे, पुन्हा आघाडीकडे वळणे आणि पुन्हा युतीच्या चर्चा सुरू करणे, या सततच्या बदलत्या भूमिकेमुळे मतदारांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. १२५ जागा अजित पवार गटाला आणि ४० जागा शरद पवार गटाला असा फॉर्म्युला ठरल्याचे जरी सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात अर्जभरणीच्या दिवशीच हा ताळमेळ बिघडल्याचे स्पष्ट झाले आहे.
या साऱ्या घडामोडींमुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असून, त्याचा थेट परिणाम निवडणुकीतील ताकदीवर होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

आणखी वाचा   षडयंत्र रचूनच पराभव घडवला’; वसंत मोरे यांचा सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप