* कायदेशीर कारवाईची नोटीस



पुणे :
पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) बसमध्ये महिलांचा अपमान करणारे चित्रीकरण केल्याप्रकरणी सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे याच्यावर ५०,००० रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणात नोटीस पाठवूनही प्रतिसाद न दिल्याने महामंडळाने ही कठोर कारवाई केली आहे.
पीएमपीच्या बसमध्ये वाहकाचा गणवेश, ई-तिकीट मशीन आणि बिल्ला यांचा कोणतीही पूर्वपरवानगी न घेता वापर करून महिलांचा अवमान करणारे चित्रीकरण करण्यात आले होते. हे चित्रीकरण समाजमाध्यमावर प्रसिद्ध झाल्यानंतर महामंडळाला माहिती मिळाली आणि २ जानेवारी रोजी अथर्व सुदामेला नोटीस पाठवण्यात आली होती. या नोटीसमध्ये सात दिवसांत लेखी स्पष्टीकरण देण्यासोबतच चित्रीकरण त्वरित हटवावे, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला होता.
मात्र, अथर्वने नोटीसला प्रतिसाद दिला नाही आणि चित्रीकरण अद्याप हटवलेले नाही. त्यामुळे पीएमपी महामंडळाने दुसरी नोटीस बजावून ५०,००० रुपयांचा दंड लावला असून, दंड त्वरित न भरल्यास भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जाईल, असे इशारा दिला आहे.
पंकज देवरे, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, यांनी सांगितले की, “सार्वजनिक बस सेवेवरील विश्वास राखणे आणि महिलांचा सन्मान जपणे महामंडळाची प्राथमिक जबाबदारी आहे. कोणत्याही व्यक्तीने पूर्व परवानगी न घेता अशा प्रकारचे चित्रीकरण केले, तर त्यावर कडक कारवाई केली जाईल.”

















