पुण्यात खेडकर कुटुंबाच्या बंगल्यात धक्कादायक चोरी

* नोकरावर गुंगीचे औषध देत लुटीचा संशय

पुणे :

बाणेर रस्त्यावरील खेडकर कुटुंबाच्या बंगल्यात अजब आणि धक्कादायक चोरीचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणाचा तपास चतुःश्रृंगी पोलीस करत आहेत. घरातीलच एका नोकराने गुंगीचे औषध देऊन चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

आयएएस पदावरून बडतर्फ करण्यात आलेल्या डॉ. पूजा खेडकर यांनी काल रात्री फोनद्वारे पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, घरातील एका नोकराने दिलीप आणि मनोरमा खेडकर यांना गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले, तर पूजा खेडकर यांना बांधून ठेवण्यात आले होते.

खेडकर कुटुंबाच्या बंगल्यात अनेक नोकर राहतात. त्यापैकी एक नोकर अवघ्या आठ दिवसांपूर्वी नेपाळहून आला होता. हाच नोकर रात्रीच्या सुमारास गुंगीचे औषध देऊन घरातील दोघांना बेशुद्ध करून, सर्वांचे मोबाईल फोन घेऊन पसार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

बांधून ठेवलेल्या अवस्थेत असतानाही पूजा खेडकर यांनी दाराच्या कडीच्या मदतीने स्वतःचे हात मोकळे केले आणि दुसऱ्या फोनवरून पोलिसांना संपर्क साधला. पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले असता दिलीप आणि मनोरमा खेडकर हे बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, मोबाईल फोनशिवाय इतर कोणत्या वस्तू चोरीला गेल्या आहेत, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. पूजा खेडकर यांनी सध्या लेखी तक्रार दिलेली नसून, मनस्थिती सावरल्यानंतर तक्रार दाखल करू, असे पोलिसांना कळवले आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे, पूजा खेडकर यांच्यावर यूपीएससी परीक्षेत ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचा गैरवापर केल्याचे गंभीर आरोप आहेत. या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने २३ डिसेंबर २०२४ रोजी त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. यूपीएससीने त्यांची उमेदवारी रद्द करत भविष्यातील सर्व परीक्षांसाठी त्यांच्यावर बंदी घातली आहे. मात्र, पूजा खेडकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

आणखी वाचा   प्रभाग ७ मध्ये तरुणाईचा राजकीय प्रवेश, २४ वर्षीय अंजली ओरसे राष्ट्रवादीकडून मैदानात

या पार्श्वभूमीवर घडलेल्या चोरीच्या घटनेमुळे खेडकर प्रकरणाला आणखी एक नवे वळण मिळाले असून, पोलीस सर्व बाजूंनी सखोल तपास करत आहेत.