* मंत्री चंद्रकांत पाटील



पुणे :
पुणे महानगरपालिकेत २०१७ ते २०२१ या अवघ्या पाच वर्षांच्या कालावधीत भारतीय जनता पक्ष सत्तेत असतानाच शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली. मात्र, महाराष्ट्राची तसेच पुणे महापालिकेची स्थापना झाल्यापासून तब्बल सहा दशके विरोधक सत्तेत होते. त्यामुळे विकासाचा हिशोब भाजपकडून नव्हे, तर विरोधकांनीच द्यावा, असा जोरदार टोला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी लगावला.
कोथरूड येथील प्रभाग क्रमांक ३१ मधील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित चौक सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत भाजप सरकारच्या कार्यकाळातील विकासकामांचा आढावा मांडला. सभेला भाजप मध्य मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, उमेदवार पृथ्वीराज सुतार, ज्योत्स्ना कुलकर्णी, वासंती जाधव, दिनेश माथवड यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
ना. पाटील म्हणाले की, भाजपच्या सत्ताकाळात पुण्यात मेट्रो प्रकल्प, समान पाणीपुरवठा योजना, सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बससेवा, नदीसुधार प्रकल्प तसेच वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाच्या चौकांत उड्डाणपुलांची उभारणी करण्यात आली. कोथरूड परिसरात घरापासून थेट मेट्रो स्थानकापर्यंत जाण्यासाठी बससेवेची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आज विरोधक भाजपवर विकास न झाल्याची टीका करत आहेत; मात्र, ६० वर्षांच्या त्यांच्या सत्ताकाळात पुण्याची स्थिती काय होती, याचा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडण्याची वेळ येणे हे त्यांच्या नियोजनाचे अपयशच दर्शवते, असा घणाघात त्यांनी केला.
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपलाच मत देण्याचे आवाहन त्यांनी केले. याला प्रतिसाद देत परमहंसनगर व गुजरात कॉलनीतील नागरिकांनी भाजप उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
















