प्रभाग ०९ मध्ये भाजपाचा पलटवार;

* अमोल बालवडकरांच्या पक्षत्यागामागे विकास नव्हे, अपूर्ण महत्त्वाकांक्षा

पुणे :

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ०९ मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, अमोल बालवडकर यांच्या पक्षत्यागावरून भारतीय जनता पार्टीने जोरदार पलटवार केला आहे. भाजपाच्या पत्रकार परिषदेत पक्षत्यागामागे विकासाचे मुद्दे नसून वैयक्तिक पदांच्या अपेक्षा अपूर्ण राहिल्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला, असा थेट आरोप करण्यात आला.

भाजपाच्या नेत्यांनी स्पष्ट केले की, महापौर किंवा स्थायी समिती अध्यक्षपद मिळावे, ही अपेक्षा पूर्ण न झाल्यानेच अमोल बालवडकर यांनी पक्ष सोडला. त्यामुळे भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वावर करण्यात येणारे आरोप हे तथ्यहीन, बिनबुडाचे आणि मतदारांची दिशाभूल करणारे असल्याचा दावा करण्यात आला.

या पत्रकार परिषदेत प्रभाग क्रमांक ०९ मधील भाजपाचे अधिकृत उमेदवार लहू गजानन बालवडकर व गणेश कळमकर, तसेच पक्षाचे पदाधिकारी प्रकाश बालवडकर आणि राहुल कोकाटे उपस्थित होते. त्यांनी अमोल बालवडकर यांनी केलेल्या आरोपांचे मुद्देसूद आणि तथ्यात्मक खंडन केले.

भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या दीड वर्षांपासून अमोल बालवडकर कोणत्याही पक्षकार्यक्रमात सक्रिय नव्हते. विकासावर टीका करणाऱ्यांनी स्वतः आजवर कोणती कामे केली आणि पुढील काळात काय नियोजन आहे, हे जनतेसमोर मांडावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

“पक्षात अनेक इच्छुकांना उमेदवारी न मिळूनही त्यांनी पक्षाशी निष्ठा राखली आहे. कारण भारतीय जनता पार्टी हा पदांचा नव्हे, तर कार्यकर्त्यांचा पक्ष आहे,” असे मत भाजपाच्या नेत्यांनी व्यक्त केले. विधानसभेपासूनच पक्षावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोपही करण्यात आला.

दरम्यान, प्रभाग क्रमांक ०९ मधील निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावरच लढवली जाणार असून, मतदारांनीही विकासालाच प्राधान्य देण्याचा निर्धार केला आहे, असा विश्वास भाजपाच्या उमेदवारांनी व्यक्त केला.

आणखी वाचा   भाजपमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांचा प्रश्न; माजी नगरसेवकांना प्राधान्य, कार्यकर्त्यांची नाराजी