कोपरा सभांतून राष्ट्रवादी काँग्रेसचा थेट जनसंवाद

* प्रभाग ११ मध्ये विकासकामांचा विश्वासाचा कौल

पुणे :

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ११ रामबाग कॉलनी–शिवतीर्थ नगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत पॅनेलचा प्रचार वेग घेत आहे. केळेवाडी परिसरातील अमरज्योत मित्र मंडळ, शिवशक्ती मित्र मंडळ, दुर्गामाता प्रतिष्ठान, राजमुद्रा प्रतिष्ठान, हनुमाननगर येथील मिलिंद संघ तसेच जयभवानीनगर परिसरात माजी उपमहापौर  दीपक मानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कोपरा सभा उत्साहात पार पडल्या.
या सभांमध्ये अधिकृत उमेदवार हर्षवर्धन दीपक मानकर, तृप्ती निलेश शिंदे आणि सौ. कांता नवनाथ खिलारे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. कोपरा सभांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागरिकांच्या विश्वासास पात्र ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
यावेळी हर्षवर्धन मानकर यांनी हनुमाननगर, केळेवाडीसह संपूर्ण प्रभागात राबविण्यात आलेल्या रस्ते विकासकामे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतेसाठी कचरा गाडी व स्वखर्चाने नियुक्त केलेले कर्मचारी, शहरी गरीब आरोग्य योजना, महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र, उभारण्यात येणारे नवे प्रसूतिगृह तसेच मामासाहेब मोहोळ शाळेत करण्यात आलेल्या विकासकामांची सविस्तर माहिती दिली. प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलमधील सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
माजी उपमहापौर दीपक मानकर म्हणाले, “हर्षवर्धन मानकर गेल्या आठ ते दहा वर्षांपासून पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन यांसह मूलभूत सुविधांसाठी सातत्याने कार्यरत आहेत. युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी मामासाहेब मोहोळ शाळेत केलेल्या विकासकामांमुळे ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमात प्रथम क्रमांक मिळाला आहे. प्रभागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेत आहेत.”
यावेळी स्थानिक नागरिक संगीता बाळकृष्ण अहिरे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, काही वर्षांपूर्वी त्यांच्या मुलीला मेंदूच्या आजारासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता होती. त्या वेळी दीपक मानकर यांनी रुग्णालयात दाखल करण्यापासून ते उपचाराचे संपूर्ण बिल भरण्यापर्यंत मोलाची मदत केली. “आज माझ्या मुलीचे लग्न होऊन तिचा संसार सुखाने सुरू आहे. हे सर्व दीपकभाऊंच्या मदतीमुळे शक्य झाले,” असे त्या म्हणाल्या.
कोपरा सभांच्या माध्यमातून झालेला हा थेट संवाद आणि मांडलेला विकासाचा लेखाजोखा मतदारांमध्ये सकारात्मक संदेश देत असल्याचे दिसून येत आहे.

आणखी वाचा   चार सदस्यीय प्रभागात मतदारांना दिलासा