-अजित पवार यांचा पुणेकरांना विश्वास



– मोफत बस व मेट्रोची घोषणा
पुणे –
पाणीटंचाई, वाढती वाहतूक कोंडी, अपुरी आरोग्ययंत्रणा, स्वच्छतेचे प्रश्न, शिक्षणाची गुणवत्ता आणि नागरिकांची सुरक्षितता या सर्व बाबींवर ठोस व परिणामकारक काम करण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केला. पुण्यासाठी सादर करण्यात येणारा विकास आराखडा केवळ जाहीरनामा न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीसह राबवला जाईल, असा ठाम विश्वास त्यांनी पुणेकरांना दिला.
पाण्याच्या प्रश्नावर बोलताना अजित पवार यांनी स्पष्ट केले की, यापूर्वी २ हजार ८१५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असला, तरीही अनेक भागांत अद्याप आवश्यक पायाभूत सुविधा उभ्या राहिलेल्या नाहीत. पुण्याच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील ३३ अपूर्ण दुवे (मिसिंग लिंक) पूर्ण करून शहराची जलव्यवस्था अधिक सक्षम, समन्वयित आणि विश्वासार्ह केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
वाहतूक कोंडीवर निर्णायक उपाय
वाहतूक कोंडीमुळे पुण्याची मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि सामाजिक हानी होत असल्याचे नमूद करत, पुणे वाहतूक कोंडीत जगातील अव्वल शहरांपैकी एक बनल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. वाहतूक कोंडीमुळे दरवर्षी हजारो कोटी रुपयांचे इंधन वाया जाते आणि नागरिकांचा मौल्यवान वेळ खर्ची पडतो.
यावर उपाय म्हणून सार्वजनिक वाहतूक अधिक आकर्षक करण्यावर भर देण्यात येणार असून, पीएमपीएमएल बससेवा आणि मेट्रो अधिक सुलभ व परवडणारी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे खासगी वाहनांची संख्या घटून प्रदूषण नियंत्रणात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्वच्छ, हरित आणि आरोग्यदायी पुण्याचा संकल्प
स्वच्छता आणि पर्यावरणाबाबत पुणेकरांची जागरूकता उल्लेखनीय असल्याचे सांगत, शहराचा वाढता बकालपणा थांबवण्यासाठी विशेष मोहिमा राबवण्यात येतील, असे अजित पवार म्हणाले.
पुण्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना आरोग्य सुविधा मात्र त्या प्रमाणात उपलब्ध नसल्याची टीका करत, रुग्णालये, बेड्स आणि प्राथमिक आरोग्य सेवा वाढवण्यावर भर दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. “शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत सुविधा सक्षम नसतील, तर पालिकेच्या कारभाराचा अर्थ उरत नाही,” असे परखड मत त्यांनी मांडले.
सुरक्षित पुण्यासाठी तंत्रज्ञान आणि पोलीस बळकटीकरण
पुणे शहर अधिक सुरक्षित करण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा, स्मार्ट सर्व्हेलन्स आणि पोलीस दल बळकट केले जाईल. यापूर्वीही पुण्याला मोठ्या प्रमाणावर पोलीस भरती आणि सीसीटीव्ही सुविधा देण्यात आल्याचे सांगत, भविष्यात गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी कठोर आणि परिणामकारक उपाययोजना राबवण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
पुणे आमचं घर – पुणेकरांशी भावनिक नाते
“पुणे हे आमचं होम टाउन आहे. या शहराशी आमचं भावनिक नातं आहे,” असे सांगत अजित पवार यांनी पुणेकरांना एकदा विश्वास टाकण्याचे आवाहन केले.
“जे शक्य आहे ते करून दाखवू आणि जे शक्य नाही ते प्रामाणिकपणे सांगू. पुढील पाच वर्षांत पुण्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.

















