नव्या चेहऱ्यांचा महापालिकेत शिरकाव

अनुभवी नगरसेवकांची संख्या घटली

पुणे –

महापालिका निवडणुकीनंतर शहराच्या राजकारणात मोठा बदल पाहायला मिळणार असून, नव्वदहून अधिक नवोदित नगरसेवक प्रथमच सभागृहात पाऊल ठेवणार आहेत. एकूण ४१ प्रभागांतून १६५ नगरसेवक निवडून आले असून, त्यापैकी तब्बल ९७ जण पहिल्यांदाच महापालिकेच्या कारभारात सहभागी होणार आहेत. त्यामुळे यावेळी अनुभवी नगरसेवकांची संख्या तुलनेने कमी राहिली आहे.

नवोदित नगरसेवकांना महापालिकेच्या कामकाजाची सखोल माहिती करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. मागील सभागृहातील काही नगरसेवकांच्या पत्नी किंवा कुटुंबीय यावेळी निवडून आले असून, आरक्षणाची फेररचना आणि पक्षीय धोरणांमुळे अनेक माजी नगरसेवकांना संधी मिळाली नाही. भाजपकडून सर्वाधिक विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्या पक्षाकडे नवोदितांची संख्या अधिक आहे.

अनुभवी नगरसेवकांमध्ये भाजपकडून रंजना टिळेकर, वर्षा तापकीर, गणेश बीडकर, श्रीनाथ भिमाले, राजाभाऊ बराटे आणि अनिल ऊर्फ बॉबी टिंगरे यांची नावे पुढे येतात. याशिवाय मानसी देशपांडे, मंजुषा नागपुरे आणि स्मिता वस्ते यांचा अनुभव सभागृहासाठी उपयुक्त ठरणार आहे. भिमाले आणि बीडकर यांनी यापूर्वी सभागृह नेतेपदाची जबाबदारी सांभाळली आहे.

विरोधी पक्षांत काँग्रेसचे अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश निकम आणि बाबुराव चांदेरे हे अनुभवी चेहरे मानले जात आहेत. शिंदे सलग पाचव्यांदा निवडून आले असून, त्यांनी स्थायी समिती अध्यक्ष व गटनेतेपद भूषविले आहे. निलेश निकम दहा वर्षांनंतर सभागृहात पुनरागमन करीत असून, १९९२ मध्ये ते सर्वात कमी वयाचे नगरसेवक ठरले होते. त्यांनी स्थायी समिती अध्यक्ष, शहर सुधारणा समिती अध्यक्ष तसेच उपमहापौरपदाची जबाबदारी पार पाडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबुराव चांदेरे सलग चौथ्यांदा निवडून आले असून, त्यांनीही स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे.

आणखी वाचा   महापालिका रणधुमाळीला वेग; भाजपची पहिली यादी सज्ज, युतीचा पेच कायम