मोफत बस–मेट्रोवर राजकीय वाद पेटला

* चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांवर निशाणा

पुणे :

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरनामा सादर करताच शहरातील राजकारण चांगलेच तापले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएमपीएमएल बस व मेट्रो सेवा मोफत करण्याची घोषणा करून नागरिकांचे लक्ष वेधले असले, तरी या घोषणांवर भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका केली आहे.

पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, महापालिकेत सत्ता येण्याची खात्री नसताना अशा प्रकारच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जात आहेत. जाहीरनाम्यांचा उद्देश अंमलबजावणीपेक्षा फक्त आश्वासनांपुरताच मर्यादित असल्याचा आरोप त्यांनी केला. अजित पवार यांच्याकडून यापूर्वीही अनेक वेळा संभ्रम निर्माण करणाऱ्या घोषणा झाल्याचे सांगत, ९९ रुपयांत वीज देण्याच्या जुन्या घोषणेचा दाखला त्यांनी दिला.

पीएमपीएमएल व मेट्रो मोफत करण्याबाबत नेमकी भूमिका काय आहे, हे स्पष्ट करण्याची जबाबदारी माध्यमांनीच घ्यावी, असा टोला पाटील यांनी लगावला. तसेच, इतर राज्यांतील निवडणुकांमध्येही अशाच प्रकारच्या लोकांना भुरळ घालणाऱ्या घोषणांचे उदाहरण देत त्यांनी टीका अधिक तीव्र केली.

दरम्यान, अजित पवार यांनी पुण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीचा मुद्दा पुढे करत आपली भूमिका मांडली आहे. पुणे शहर वाहतूक कोंडीत देशातील आघाडीच्या शहरांमध्ये असून, यामुळे इंधन व वेळेचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असल्याचे त्यांनी सांगितले. सार्वजनिक वाहतूक मोफत केल्यास खासगी वाहनांचा वापर कमी होईल, प्रदूषणात घट होईल आणि पुणेकरांना दिलासा मिळेल, असा दावा त्यांनी केला आहे.

मोफत सार्वजनिक वाहतुकीच्या घोषणेमुळे पुणे महापालिका निवडणुकीतील प्रचारात आता आरोप-प्रत्यारोपांचा नवा फड रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.

आणखी वाचा   ईडीची बारामती आणि पुणे जिल्ह्यांमध्ये मोठी कारवाई