पुणे :



राज्यातील दहावी व बारावीच्या सुरू असलेल्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित ठेवण्याचे आणि सर्व चित्रीकरण जतन करण्याचे सक्त आदेश दिले आहेत. पारदर्शकता राखण्यासाठी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी यंदा या उपाययोजनांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे.
परीक्षा काळात केंद्र परिसर, वर्गखोल्या तसेच ऑनलाइन परीक्षांसाठी वापरल्या जाणाऱ्या संगणक प्रयोगशाळांमधील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू ठेवणे बंधनकारक राहणार आहे. परीक्षा सुरू होण्याच्या किमान ३० मिनिटे आधी आणि परीक्षा संपल्यानंतरही काही काळ रेकॉर्डिंग सुरू ठेवण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
चित्रीकरण जतन न करणे, कॅमेरे बंद ठेवणे किंवा मागणी केल्यास फुटेज उपलब्ध न करून देणे हे गैरप्रकार करण्याच्या उद्देशाने केलेले कृत्य मानले जाईल, असा इशाराही मंडळाने दिला आहे. अशा प्रकरणांत संबंधित केंद्राचे प्राचार्य, केंद्र संचालक आणि समन्वयक यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल.
प्रत्येक पेपर दिवशीचे रेकॉर्डिंग स्वतंत्र पेनड्राइव्ह किंवा संगणकावर संग्रहित करणे आवश्यक असून, फुटेजचा आकार मोठा असल्यास हार्डडिस्कमध्ये जतन करण्याचे निर्देश आहेत. डीव्हीआर/एनव्हीआरमध्ये किमान एक टीबी क्षमतेची हार्डडिस्क असणे आवश्यक आहे. मूळ चित्रीकरणात कोणत्याही प्रकारची छेडछाड होऊ नये, याबाबतही विशेष दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
विभागीय मंडळ, जिल्हा दक्षता समिती किंवा राज्य मंडळाने मागणी केल्यास संबंधित परीक्षा केंद्रांनी तत्काळ चित्रीकरण उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. आवश्यकतेनुसार बॅकअप ठेवणेही बंधनकारक करण्यात आले आहे.
गैरप्रकार रोखण्यासाठी ‘गैरमार्ग प्रतिबंध अधिनियम १९८२’ अंतर्गत कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला असून, परीक्षा प्रक्रियेत शिस्त आणि पारदर्शकता अबाधित ठेवण्याचा मंडळाचा निर्धार यानिमित्ताने स्पष्ट झाला आहे.

















