पुणे :



महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एक मिनिटाचा विलंब निर्णायक ठरला आणि भाजपचे श्रीनाथ भिमाले यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुहास टिंगरे यांचा अर्ज नियोजित वेळेनंतर सादर झाल्याने तो अवैध ठरविण्यात आला. त्यामुळे भिमाले यांचाच एकमेव वैध अर्ज उरल्याने निवडणूक बिनविरोध झाली.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान अर्जांची छाननी करताना निवडणूक निर्णय अधिकारी तथा एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश खडके यांनी टिंगरे यांचा अर्ज विहित मुदतीनंतर आल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे नियमांनुसार तो ग्राह्य धरता येणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. महापालिका अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, नगरसचिव योगिता भोसले आणि स्थायी समिती सदस्य या वेळी उपस्थित होते.
१६ सदस्यीय स्थायी समितीत भाजपचे तब्बल १२ सदस्य आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ३ आणि काँग्रेसचा १ सदस्य आहे. संख्याबळ भाजपच्या बाजूने असतानाही राष्ट्रवादीने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र अर्जाच्या वेळेबाबत वाद निर्माण झाल्याने निवडणूक प्रत्यक्ष मतदानापर्यंत पोहोचली नाही.
दरम्यान, टिंगरे यांचा अर्ज फेटाळल्यानंतर राष्ट्रवादीकडून आक्षेप नोंदविण्यात आला. काही सदस्यांनी अर्ज वेळेत दाखल झाल्याचा दावा करत पुनर्विचाराची मागणी केली; मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी नियमांचा दाखला देत निर्णय कायम ठेवला. माघार घेण्याची संधी देण्यात आली असतानाही राष्ट्रवादी सदस्यांनी सभागृहातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
यापूर्वी २०१७ मध्ये सभागृहनेतेपदाची जबाबदारी सांभाळलेल्या भिमाले यांच्याकडे आता स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची धुरा आली आहे. महापालिकेच्या आर्थिक आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये महत्त्वाची भूमिका असलेल्या या पदावर त्यांची निवड झाल्याने आगामी कारभाराकडे लक्ष लागले आहे.

















