समाजवादी पक्षाचे पुणे महानगरपालिकेसमोर बेमुदत धरणे आंदोलन; भेदभावपूर्ण अतिक्रमण कारवाईविरोधात तीव्र निषेध

पुणे :

पुणे महानगरपालिकेकडून सुरू असलेल्या कथित भेदभावपूर्ण व पक्षपाती अतिक्रमण कारवाईच्या निषेधार्थ समाजवादी पक्षाच्या वतीने आज पुणे महानगरपालिकेसमोर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात पुणे शहर अध्यक्ष जांबुवंत मनोहर, प्रदेश सरचिटणीस अनिस अहमद, महिला जिल्हाध्यक्षा साधनाताई शिंदे, पुणे शहर सरचिटणीस दत्ता पाकिरे, कार्यकारिणी सदस्य विनायक लांबे, सचिव शहाजहान झारी, कार्याध्यक्ष (छत्रपती शिवाजी महाराज नगर मतदारसंघ) अझीम शेख, इब्राहिम यवतमाळवाले, सरफराज पटेल तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान पुणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते ॲड. निलेश निकम यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला.

आंदोलनस्थळी “सर्वांसाठी समान न्याय मिळालाच पाहिजे”, “गरीबांवरील अन्याय बंद करा”, “भेदभावपूर्ण कारवाईचा निषेध असो” अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेचा तीव्र निषेध नोंदविताना सांगितले की, अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली गरीब व सर्वसामान्य पथारीधारकांवर कठोर कारवाई केली जाते; मात्र उच्चभ्रू व आर्थिकदृष्ट्या सक्षम घटकांच्या बेकायदेशीर अतिक्रमणांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. ही भूमिका अन्यायकारक असून संविधानिक समतेच्या तत्त्वालाच छेद देणारी असल्याचा आरोप करण्यात आला.

यावेळी ‘पथ विक्रेता एकता समिती’नेही आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत प्रशासनाच्या दुहेरी निकषांचा निषेध केला. पथविक्रेत्यांवर होणाऱ्या कारवाईदरम्यान मारहाण, दंडात्मक कारवाई आणि उपजीविकेवर गदा आणणाऱ्या उपाययोजनांचा निषेध करण्यात आला. “पथविक्रेते हे शहराच्या अर्थचक्राचा महत्त्वाचा भाग असून त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे,” असे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.

आणखी वाचा   पुणे विमानतळावर सीमाशुल्कची धडक कारवाई