पुणे मतदार यादीतील तीन लाखांहून अधिक दुबार नावे; महापालिकेची निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शनाची मागणी

पुणे:

पुणे महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीत तब्बल तीन लाखांहून अधिक दुबार नावे आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. या नावांबाबत पुढील कार्यवाही कशी करावी, याबाबत मार्गदर्शक सूचना द्याव्यात, अशी विनंती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.

महापालिका निवडणुकांसाठी पंधरा दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणात दुबार नावे असल्याचे स्पष्ट झाले. काही नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी स्वतंत्ररित्या केलेल्या तपासणीतही अनेक दुबार नोंदी आढळल्या असून, प्रत्यक्ष दुबार नावांची संख्या अधिक असण्याची शक्यता आयुक्तांनी व्यक्त केली.

आयुक्त राम म्हणाले की, “दुबार नावे वगळण्यासाठी आम्हाला स्पष्ट मार्गदर्शन आवश्यक आहे. निवडणूक याद्यांचे संकलन महापालिका करत नाही; आयोगाकडून येणाऱ्या याद्याच आम्हाला वापराव्या लागतात. नावांची नोंद किंवा वगळण्याचा अधिकार महापालिकेकडे नाही.”

काही मतदारांची नावे असून पत्ता उपलब्ध नसल्याने ही नावे ब्लॉकनिहाय यादीत ठेवण्याचा पर्याय विचारात घेतला जात आहे. दुबार नावे असलेल्या मतदारांनी दोनदा मतदान होऊ नये, यासाठी जनजागृतीसह प्रत्यक्ष सर्वेक्षणाची गरज भासणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आणखी वाचा   १९ वी भीमथडी जत्रा महोत्सवाची तयारी पूर्ण