निवडणुकीनंतर राष्ट्रवादी पुन्हा एकत्र?

* अजित पवारांच्या सूचक विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ

पुणे :

महाराष्ट्राच्या राजकारणात काका-पुतण्यातील वाद खरा की रणनीतीचा भाग, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या एका सूचक वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट भविष्यात एकत्र येण्याची शक्यता चर्चेत आली आहे. त्यांच्या या विधानामुळे सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोटात राजकीय हालचालींना वेग आला आहे.

एका पॉडकास्टमध्ये बोलताना अजित पवार म्हणाले, “राजकारणात कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो.” सध्या निवडणुकांची धावपळ सुरू असल्याने यावर सविस्तर विचार केलेला नाही, मात्र दोन्ही बाजूंचे खालच्या पातळीवरील कार्यकर्ते संभाव्य एकत्रिकरणाबाबत सकारात्मक असल्याचे त्यांनी नमूद केले. या वक्तव्याने पडद्यामागील घडामोडींबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

याच संवादात अजित पवारांनी पुणे शहरातील वाहतूक कोंडी आणि महापालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. “पूर्वी दहा मिनिटांत होणारा प्रवास आता दीड तास घेतो. पुणेकरांचा अमूल्य वेळ ट्रॅफिकमध्ये वाया जात आहे,” अशी टीका त्यांनी केली. खड्डे बुजवण्यासाठी हजारो कोटींची तरतूद असूनही रस्त्यांची दयनीय अवस्था कायम असल्याचा आरोप करत विकासनिधीच्या वापरावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

दरम्यान, पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित जमीन व्यवहारांवरील आरोपांवर खुलासा करताना अजित पवार म्हणाले की, आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत त्यांनी कधीही चुकीच्या कामासाठी दबाव टाकलेला नाही. “या व्यवहाराची माहिती असती, तर तो होऊच दिला नसता,” असे स्पष्ट करत त्यांनी आरोप फेटाळून लावले.

अजित पवारांच्या या विधानांमुळे येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे फेरबदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा   पुणे–मुंबई हेलिकॉप्टर प्रवास महागला;