एप्रिल-मे पर्यंत २,५०० नव्या गाड्या पीएमपीच्या ताफ्यात

*खासदार मुरलीधर मोहोळ यांचे आश्वासन

पुणे :

शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाकांक्षी विस्तार करण्याची योजना हाती घेण्यात आली असून एप्रिल-मे २०२६ पर्यंत सुमारे २,५०० नव्या गाड्या पीएमपीच्या ताफ्यात दाखल केल्या जातील, असे आश्वासन पुण्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी दिले. या विस्तारामुळे पीएमपीएमचा ताफा ४,००० गाड्यांचा होईल तसेच दररोज १८ ते २० लाख प्रवाशांना सुरक्षित, सुलभ, जलद आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध होईल, असा विश्वासही मोहोळ यांनी व्यक्त केला.

महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मोहोळ यांनी शुक्रवारी पर्वती विधानसभा मतदार संघामध्ये मध्ये पदयात्रा आणि रॅलीद्वारे मतदारांशी संपर्क साधला.  त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सार्वजिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यावर भाजपचा भर असून त्यासाठीच मेट्रो आणि पीएमपी या दोन्ही सेवा कार्यक्षमतेने चालवण्याचे नियोजन आहे, असे मोहोळ यांनी सांगितले. नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या.

विस्तारित पीएमआरडीएसह शहरातील बस मार्ग व फेऱ्यांचा फेरआढावा घेतला जाणार आहे. ताफ्यात एक हजार ई-बस आणण्याचीही प्रक्रिया सुरू आहे. या गाड्या केंद्र सरकारने मंजूर केल्या आहेत. सध्या ३९४ मार्गांवर सेवा देणाऱ्या पीएमपीच्या मार्गात आणखी किमान १०० नवीन मार्गांची भर पडेल. त्यामुळे उपनगरातील दुर्लक्षित भाग, झपाट्याने विकसित होत असलेले शहराबाहेरील परिसर तसेच औद्योगिक आणि आयटी हब्सपर्यंत सार्वजनिक वाहतूक सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचेल, असाही दावा मोहोळ यांनी केला.

आणखी वाचा   भाजपची उमेदवारी गाळणी कडक ; ३० ते ४० माजी नगरसेवक बाहेर,