पुणे :



शहराच्या वाहतूक व्यवस्थेला दिलासा देणारा आणि अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल येत्या तीन दिवसांत सुरू होणार आहे. मंगळवारपर्यंत पूल पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असून, कोणताही औपचारिक समारंभ न करता तो थेट नागरिकांच्या सेवेत देण्यात येईल, अशी माहिती पीएमआरडीए आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे यांनी दिली.
शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या चौकांपैकी एक असलेल्या विद्यापीठ चौकात दररोज हजारो वाहनांची ये-जा होते. आयटी पार्क, औंध, बाणेर, पाषाण आणि मुंबई-बंगळूर महामार्गाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर सिग्नलवरील प्रतीक्षा वेळ लक्षणीयरीत्या कमी होऊन प्रवास अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
परवडणाऱ्या घरांचा प्रकल्प अंतिम टप्प्यात
पीएमआरडीएकडून राबविण्यात येणाऱ्या गृहनिर्माण योजनेबाबत बोलताना म्हसे यांनी सांगितले की, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सुमारे दहा हजार घरांची उभारणी करण्यात आली आहे. त्यापैकी चार हजार घरांचे वाटप पूर्ण झाले असून, उर्वरित साडेसहा हजार घरांचे वाटप मार्चअखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पामुळे शहराच्या उपनगरांमध्ये परवडणारी घरे उपलब्ध होणार आहेत.
५७ गावांत मलनिस्सारणाची मोठी योजना
पुणे महानगर प्रदेशात झपाट्याने होत असलेल्या नागरी विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शहरालगतच्या ५७ गावांसाठी सुमारे १२०० कोटी रुपयांची भूमिगत मलनिस्सारण योजना राबविण्यात येणार आहे. येत्या एक-दोन महिन्यांत या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होईल. या योजनेमुळे वाढत्या लोकसंख्येला सुसज्ज पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत.
नद्यांच्या स्वच्छतेसाठी कोट्यवधींची गुंतवणूक
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी इंद्रायणी रिव्हर्स, पवना रिव्हर्स व मुळा मुठा. रिव्हर्स यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी स्वतंत्र प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. इंद्रायणी नदीसाठी सुमारे ७५० कोटी रुपये, पवना नदीसाठी २५० कोटी रुपये खर्चाची कामे मंजूर करण्यात आली असून, मुळा-मुठा नदीसाठी सुमारे ९०० कोटी रुपयांच्या कामांची निविदा लवकरच प्रसिद्ध होणार आहे.
शहराच्या पायाभूत सुविधा, गृहनिर्माण आणि पर्यावरण संवर्धन या तिन्ही आघाड्यांवर मोठ्या प्रमाणात कामे सुरू असून, पुढील काही महिन्यांत त्याचे ठोस परिणाम नागरिकांना अनुभवायला मिळतील, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

















