पुणे :



आगामी महापालिका निवडणुका शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी पुणे पोलिसांनी व्यापक तयारी सुरू केली असून, कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करू शकणाऱ्यांविरोधात कडक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत शहरात साडेपाच हजारांहून अधिक व्यक्तींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे शहरातील वर्षभरातील गुन्हेगारी परिस्थिती, गंभीर गुन्ह्यांची आकडेवारी आणि आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, मनोज पाटील, संजय पाटील, राजेश बनसोडे यांच्यासह उपायुक्त हिंमत जाधव, राजलक्ष्मी शिवणकर, डॉ. राजकुमार शिंदे, मिलिंद मोहिते, कृषीकेश रावले, संभाजी देशमुख, संदीप भाजीभाकरे उपस्थित होते.
महापालिका निवडणुकीच्या काळात शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार असून, निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडणे आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे हे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून सातत्याने नजर ठेवली जाणार आहे.
मतदारांवर थेट किंवा अप्रत्यक्ष दबाव टाकण्याच्या घटना, पैशांचा गैरवापर तसेच इतर बेकायदेशीर प्रकार रोखण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशा कोणत्याही गैरप्रकारांची माहिती नागरिकांनी तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहनही अमितेश कुमार यांनी केले.
दरम्यान, गंभीर गुन्ह्यांमध्ये शिक्षेचे प्रमाण वाढविण्यावर पोलीस प्रशासनाचा भर असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी अंमलात आलेल्या भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत कारवाईस सुरुवात करण्यात आली असून, त्यासाठी पोलिसांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. ई-साक्ष ॲपचा प्रभावी वापर, तसेच सात वर्षांपेक्षा अधिक शिक्षेची तरतूद असलेल्या गंभीर गुन्ह्यांमध्ये तातडीने न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या व्हॅनद्वारे पुरावे संकलन करण्यात येत आहे.

















