काँग्रेस–शिवसेना (उद्धव) आघाडी निश्चित , १०० जागांवर एकमत

पुणे :

पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी आघाडी करण्याचा निर्णय घेतला असून, पहिल्या टप्प्यात १०० जागांवर जागावाटपावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या करारानुसार काँग्रेसला ६० तर शिवसेनेला ४० जागा देण्यात येणार आहेत. काही प्रभागांतील उमेदवारांची नावे अद्याप निश्चित व्हायची असून, त्याबाबत आज दिवसभर चर्चा करून रात्री उशिरापर्यंत अंतिम निर्णय होईल, अशी माहिती नेत्यांनी दिली.
शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन आहिर आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी, रमेश बागवे, अभय छाजेड, दीप्ती चवधरी तसेच शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर, कामगार नेते रघुनाथ कुचिक, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, प्रशांत बधे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सतेज पाटील यांनी सत्ताधारी भाजपवर तीव्र टीका करताना सांगितले की, पुणे शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न, वाहतूक कोंडी, हिंजवडीतील दैनंदिन वाहतूक अडचणी, नवले पुलाजवळील वारंवार होणारे अपघात, वाढती गुन्हेगारी आणि कोयता गँगसारख्या घटनांमुळे नागरिक त्रस्त आहेत. या मूलभूत प्रश्नांवर उपाय करण्यात सत्ताधारी पक्ष अपयशी ठरला असून, महापालिकेतील कारभार भ्रष्टाचाराने ग्रासल्याचा आरोप त्यांनी केला. विरोधकांचे उमेदवार कमी करण्यासाठी भाजप दबावाचे राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सोमवारी पहाटेपर्यंत चाललेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर १०० जागांवर अंतिम निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सोबत प्राथमिक चर्चा झाली होती; मात्र पुढील बैठक न झाल्याने अखेर काँग्रेस–शिवसेना यांच्यात थेट जागावाटप ठरवण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. तसेच वंचित बहुजन आघाडीशीही समन्वयाबाबत चर्चा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सचिन आहिर यांनी पुण्यातील मतदार सत्ताधारी पक्षांचा ‘दुहेरी डाव’ ओळखत असल्याचा दावा केला. “राज्यात एकत्र सत्ता भोगायची आणि पुण्यात मात्र वेगळे लढायचे, ही भूमिका पुणेकर स्वीकारणार नाहीत. आदित्य ठाकरे यांनी पुण्यासाठी स्पष्ट विकासदृष्टी मांडली असून, शहरातील मतदार काँग्रेस–शिवसेना आघाडीला संधी देतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिवसेना–मनसे यांच्यातही जागावाटपाबाबत चर्चा सुरू असून, आतापर्यंत २१ जागांवर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहिर यांनी दिली. समविचारी पक्षांशी समन्वय सुरू असल्याने उर्वरित जागांवर लवकरच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा   औंध - बोपोडी परिसराच्या विकासाला गती देणार