महापालिका निवडणुकीत ७५० उमेदवारांचे अनामत जप्त; प्रमुख पक्षांनाही मोठा फटका

पुणे :

चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत तब्बल १,१५३ उमेदवार रिंगणात उतरले होते. मात्र, निकालानंतर ७५० उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाल्याचे निवडणूक विभागाने जाहीर केले आहे. प्रमुख राजकीय पक्षांनाही या फटक्याला सामोरे जावे लागले असून, अनेक पक्षांचे मोठ्या संख्येने उमेदवार आवश्यक मतांची किमान मर्यादा गाठू शकले नाहीत.
१६ जानेवारी रोजी जाहीर झालेल्या निकालात भाजपने ११९ जागांसह स्पष्ट बहुमत मिळवले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला २७, काँग्रेसला १५, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला ३, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला केवळ १ जागा मिळाली.
निवडणूक विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, शिंदे गटाच्या शिवसेनेच्या सर्वाधिक ८७ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. भाजपसोबतची युती तुटल्यानंतर शिवसेनेने १२० जागांवर उमेदवार उभे केले होते; मात्र एकही जागा जिंकता आली नाही. काँग्रेसने ९२ जागांवर लढत देत ५० उमेदवारांची अनामत गमावली, तर ठाकरे गटाच्या ६२ उमेदवारांपैकी ४२ जणांचे डिपॉझिट जप्त झाले.
मनसेने ४४ जागांवर उमेदवार उभे केले होते. विजय मिळवण्यात अपयश आलेच, शिवाय ३१ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने १३९ जागा लढवत १४ उमेदवारांचे डिपॉझिट गमावले, तर शरद पवार गटाच्या ३४ पैकी १९ उमेदवारांची अनामत जप्त झाली. आम आदमी पक्षाने ८१ जागांवर उमेदवार दिले होते; त्यातील सर्व ८१ जणांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
भाजपलाही चार ठिकाणी धक्का
सर्व १६३ जागांवर उमेदवार उभे करणाऱ्या भाजपच्या चार उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. विशेष म्हणजे हे चारही उमेदवार प्रभाग क्रमांक १९ (कोंढवा खुर्द–कौसर बाग) येथील आहेत. मुस्लिम बहुल या प्रभागात काँग्रेसचे तीन आणि राष्ट्रवादी पवार गटाचा एक उमेदवार विजयी झाला.
अनामत जप्तीची प्रक्रिया काय?
एखाद्या प्रभागात ‘नोटा’ वगळून इतर सर्व उमेदवारांना मिळालेल्या मतांची सरासरी काढली जाते. त्या सरासरी मतांच्या एक अष्टांशपेक्षा कमी मते मिळाल्यास संबंधित उमेदवाराची अनामत रक्कम जप्त होते. सर्वसाधारण गटासाठी ५,००० रुपये, तर आरक्षित गटासाठी २,५०० रुपये इतकी रक्कम अर्जासोबत भरावी लागते.
अपक्षांचा मोठा वाटा
अनामत जप्त झालेल्या ७५० उमेदवारांपैकी ३२८ उमेदवार प्रमुख पक्षांचे आहेत. उर्वरित ४२२ उमेदवारांमध्ये वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टीसह लहान पक्षांचे आणि सर्वाधिक अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.
या निकालामुळे महापालिकेच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून, आगामी राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा   पुरुष दात्यांची संख्या अधिक