पुणे :



होळी सणानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता पुणे रेल्वे स्थानक येथे रेल्वे प्रशासनाने विशेष उपाययोजना राबविल्या आहेत. सणासुदीच्या काळात प्लॅटफॉर्मवर होणारी अनियंत्रित गर्दी टाळण्यासाठी स्थानक परिसरात स्वतंत्र ‘होल्डिंग एरिया’ उभारण्यात आला असून, प्रवाशांना शिस्तबद्ध पद्धतीने गाडीत चढविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
प्लॅटफॉर्मलगत पार्सल विभागाशेजारी तयार करण्यात आलेल्या या कक्षात विशेषतः उत्तर भारत, कोकण तसेच अन्य भागांत जाणाऱ्या होळी विशेष गाड्यांच्या प्रवाशांना थांबवले जात आहे. गाडी प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर प्रवाशांना एका रांगेतून नियोजनबद्ध पद्धतीने गाडीत प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्मवरील अनावश्यक गर्दी आटोक्यात ठेवण्यात प्रशासनाला यश येत आहे.
गतकाळातील घटनांची पार्श्वभूमी
काही वर्षांपूर्वी पुणे स्थानकावर झालेल्या गर्दीत गुदमरल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तसेच मुंबईतही अशाच प्रकारची दुर्घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी यंदा प्रशासनाने अधिक खबरदारी घेतली आहे. होळीबरोबरच दसरा, दिवाळी, छठपूजा आदी सणांच्या काळातही या नियोजनाचा लाभ होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
होल्डिंग एरियातील सुविधा
प्रवाशांच्या सोयीसाठी होल्डिंग एरियामध्ये विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये –
मोबाईल चार्जिंगची व्यवस्था
चल स्वच्छतागृह
पंखे
पिण्याच्या पाण्याची सुविधा
बसण्याची व्यवस्था
ऊन, वारा व पावसापासून संरक्षणासाठी आच्छादन
गाड्यांची अद्ययावत माहिती देणारा इलेक्ट्रॉनिक फलक
रेल्वे सुरक्षा दलाचा कडक बंदोबस्त
अतिरिक्त मनुष्यबळ व तिकीट व्यवस्था
गर्दीच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त तिकीट काऊंटर सुरू करण्यात आले असून, स्वयंचलित तिकीट यंत्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. वाणिज्य विभागाचे कर्मचारी, तिकीट तपासनीस, रेल्वे सुरक्षा दलाचे जवान तसेच निरीक्षक यांची अतिरिक्त नियुक्ती करण्यात आली आहे. नियंत्रण कक्ष व मदत केंद्रही कार्यान्वित करण्यात आले आहे.
मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे विभागीय वाणिज्य अधिकारी तथा जनसंपर्क अधिकारी हेमंतकुमार बेहरा यांनी सांगितले की, “होळीच्या पार्श्वभूमीवर विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रवाशांची सुरक्षितता हे आमचे प्राधान्य असून, होल्डिंग एरियामुळे प्लॅटफॉर्मवरील गर्दी नियंत्रणात ठेवणे शक्य होत आहे.”
यंदाच्या होळी सणात प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ व्हावा, यासाठी रेल्वे प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

















