अहिल्यानगर : शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर गुरुवारी रात्री संगमनेरमध्ये हल्ला झाला. मालपाणी लॉन्स येथे राजस्थान युवक मित्र मंडळ आयोजित संगमनेर फेस्टिव्हलच्या उद्घाटन सोहळ्यात ही घटना घडली. हात मिळवण्याच्या बहाण्याने एका तरुणाने आमदार खताळ यांच्यावर झडप घातली. या अनपेक्षित हल्ल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी तातडीने धाव घेत हल्लेखोराला ताब्यात घेतले.



संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ असे हल्लेखोराचे नाव असून त्याला घटनास्थळीच अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला मालपाणी लॉन्समधील एका ऑफिसमध्ये ठेवण्यात आले. दरम्यान, घटनेनंतर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमल्याने परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
आमदारांचा संयमाचा सल्ला
घटनास्थळी घोषणाबाजी सुरू असताना आमदार अमोल खताळ यांनी स्वतः उपस्थित राहून कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले. “या घटनेमागील सूत्रधार शोधला जाईल. पण कायदा हातात घेऊ नका, पोलिस प्रशासनाला सहकार्य करा,” असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
शहरात बंदोबस्त वाढवला
हल्ल्याची माहिती मिळताच खताळ समर्थक मोठ्या संख्येने मालपाणी लॉन्सच्या बाहेर जमा झाले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी शहरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महायुतीची कडक भूमिका
जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. “हा भ्याड हल्ला असून दोषींवर तातडीने कारवाई करावी. लोकशाही मान्य नसेल तर महायुतीचे कार्यकर्ते त्याच भाषेत उत्तर देतील. भ्याड हल्ल्याने आमचा आत्मविश्वास ढळणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
काँग्रेसचाही निषेध
या घटनेचा काँग्रेसतर्फेही निषेध करण्यात आला आहे. “आमदारांवरील हल्ला चुकीचा असून पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करावी. सत्य आणि वस्तुस्थिती पोलिसांच्या निवेदनातून स्पष्ट व्हावी,” अशी मागणी तालुका काँग्रेस अध्यक्ष अजय फटांगरे आणि शहर काँग्रेस अध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी केली.

















