स्वीकृत नगरसेवकपदासाठी राजकीय हालचालींना वेग; ९ मार्चला नावांची अंतिम मुदत

पुणे :

पुणे महानगरपालिकामध्ये सत्तास्थापनेनंतर आता स्वीकृत नगरसेवक पदांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू होताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महापौर, उपमहापौर, सभागृह नेते आणि स्थायी समिती अध्यक्ष पदांवरील निवडीनंतर आता सर्वांचे लक्ष स्वीकृत नगरसेवकांच्या दहा जागांकडे लागले आहे. इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये मोठी चुरस निर्माण झाली असून, पक्षांतर्गत हालचाली तीव्र झाल्या आहेत.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सर्व पक्षांच्या गटनेत्यांना स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिफारस केलेली नावे सादर करण्याचे पत्र पाठविले आहे. त्यानुसार ९ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत आयुक्तांकडे नावे सादर करावी लागणार आहेत. त्यानंतर मार्च महिन्यातील पहिल्या सर्वसाधारण सभेत या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे.

उपलब्ध जागांपैकी भाजपला ७, राष्ट्रवादी काँग्रेसला २ आणि काँग्रेसला १ अशी जागा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संबंधित पक्षांत इच्छुकांची गर्दी वाढली असून, स्थानिक पातळीवर लॉबिंग सुरू झाले आहे.

महापालिका निवडणुकीदरम्यान उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. मात्र तिकीट वाटपाच्या प्रक्रियेत काही ज्येष्ठ आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी न मिळाल्याने नाराजीचा सूर उमटला होता. काहींना एबी फॉर्म मिळूनही उमेदवारी नाकारली गेली, तर काहींची उमेदवारी विविध कारणांमुळे बाद करण्यात आली. बाहेरून आणलेल्या उमेदवारांमुळे स्थानिक कार्यकर्त्यांना डावलले गेल्याचीही भावना व्यक्त झाली होती.

या पार्श्वभूमीवर नाराज कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी पक्ष नेतृत्वाकडून स्वीकृत नगरसेवक पदाचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे अनेक इच्छुक आता या संधीची वाट पाहत आहेत. पुढील काही दिवसांत या नियुक्त्यांवरून पक्षांतर्गत समीकरणे आणि राजकीय समतोल कसा राखला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा   महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात चार दिवस ‘ड्राय डे’; तळीरामांना मोठा धक्का