* ५६ तोळे सोन्याचे दागिने, कोयता जप्त; पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई



पुणे :
हवेली तालुक्यातील खानापूर गावात भर दिवसा सराफ दुकानावर सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत जेरबंद केले आहे. या कारवाईत सुमारे ५६ तोळे २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, अंदाजे ७० लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरलेला कोयता हस्तगत करण्यात आला आहे.
दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास खानापूर येथील वैष्णवी ज्वेलर्स या सराफ दुकानावर पाच अनोळखी दरोडेखोरांनी तलवार व कोयत्यासारखी धारदार शस्त्रे दाखवत सशस्त्र दरोडा टाकला होता. दुकानातील मालक व महिला कर्मचाऱ्यांना धमकावत सुमारे ८४ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम, असा एकूण सुमारे १ कोटी ५ लाख रुपयांचा मुद्देमाल लुटण्यात आला होता. याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल व अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला गती दिली. स्थानिक गुन्हे शाखा, हवेली व वेल्हे पोलीस ठाण्यांची एकूण सहा विशेष पथके तयार करून शोधमोहीम राबविण्यात आली.
सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय बातमीदारांची माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे दरोडेखोरांचा माग काढण्यात आला. तपासात दरोड्यानंतर आरोपी पानशेत–वेल्हे मार्गे जंगलाच्या दिशेने पळाल्याचे निष्पन्न झाले. अखेर २८ डिसेंबर २०२५ रोजी संगमपूर डोंगर परिसरातील जंगलातून अंकुश दगडू कचरे (वय २०) व गणेश भांबु कचरे (वय २२) या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत या गुन्ह्यात आणखी तीन विधीसंघर्षित बालकांचा सहभाग असल्याचे उघड झाले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला कोयता व मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. मुख्य आरोपी अंकुश कचरे याच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना ५ जानेवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

















