वानवडीतील दोन जागांवरून महाविकास आघाडीत खळबळ

पुणे :

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत अंतर्गत राजकारण तापले असून, माजी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातून बाहेर पडून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या जगताप यांना वानवडी–हडपसर परिसरातील उमेदवारी मिळणार की नाही, याबाबत सध्या अनिश्चितता आहे.
महाविकास आघाडीच्या अलीकडील बैठकीत २०१७ मध्ये निवडून आलेल्या प्रभाग क्रमांक २५ मधील दोन्ही जागांवर राष्ट्रवादी पवार गटाने ठाम दावा केला आहे. या जागांवरील अंतिम निर्णय पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे स्वतः घेतील, असेही स्पष्ट करण्यात आल्याने काँग्रेसमधील अस्वस्थता वाढली आहे. परिणामी, आघाडीतील दोन प्रमुख घटक पक्षांमध्ये नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या समीकरणांवर मोठ्या हालचाली सुरू आहेत. कोण कोणासोबत जाणार, यावरून राजकीय चर्चांना उधाण आले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य एकत्रिकरणाला विरोध करत प्रशांत जगताप यांनी पक्षाला रामराम ठोकला होता. त्यानंतर आपण मतदारांशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ, असे सांगत अवघ्या दोन दिवसांत त्यांनी थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, या निर्णयाची पूर्वकल्पना स्थानिक काँग्रेस नेत्यांनाही देण्यात न आल्याने पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली.
वानवडी परिसरात काँग्रेसचे पारंपरिक प्राबल्य असल्याने जगताप यांच्या प्रवेशाला आधीपासूनच काही प्रमाणात विरोध होता. त्यातच आता राष्ट्रवादी पवार गटाने या दोन जागा आपल्या हक्काच्या असल्याचे जाहीरपणे सांगितल्याने परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे. विशेष म्हणजे, या प्रभागातील दोन जागांवर प्रशांत जगताप आणि त्यांची आई रत्नप्रभा जगताप यांची यापूर्वी निवड झाली होती.
या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी पवार गट आणि प्रशांत जगताप यांच्यात सुरू असलेल्या शीतयुद्धाचा फटका थेट उमेदवारीवर बसण्याची चिन्हे आहेत. जगताप यांच्या भूमिकेमुळे वरिष्ठ नेते नाराज असून, सध्याच्या राजकीय गोंधळाला तेच जबाबदार असल्याची भावना पक्षांतर्गत व्यक्त केली जात आहे. जर या दोन जागांवरील तिढा लवकर सुटला नाही, तर महाविकास आघाडीतील एकजूट धोक्यात येण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

आणखी वाचा   पुणे महानगर पालिकेतील सर्वाधिक उच्चशिक्षित चेहरा 'सनी निम्हण'