मतदानासाठीच पुण्यात प्रवेश; गजानन मारणेला उच्च न्यायालयाची दोन दिवसांची मुभा

पुणे :

पुणे महानगरपालिका निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मकोका अंतर्गत आरोपी असलेल्या गजानन मारणेला उच्च न्यायालयाने दोन दिवस पुण्यात येण्याची विशेष परवानगी दिली आहे. गुरुवार आणि शुक्रवार या कालावधीतच त्याला शहरात राहण्याची मुभा देण्यात आली असून, याव्यतिरिक्त पुणे महानगरपालिका हद्दीत प्रवेशास बंदी कायम राहणार आहे.
कोथरूड परिसरात आयटी क्षेत्रातील एका कर्मचाऱ्यावर झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात गजानन मारणे व त्याच्या टोळीतील दहा जणांवर मकोका कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात सत्र न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला असला, तरी उच्च न्यायालयात दाखल याचिकेवरील अंतिम निर्णय होईपर्यंत सुनावणीच्या तारखांशिवाय शहरात येण्यास मनाई करण्यात आली होती.
दरम्यान, गजानन मारणेची पत्नी जयश्री मारणे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महापालिका निवडणूक लढवत असल्याने या प्रकरणाला राजकीय रंग चढला होता. पत्नीच्या प्रचारासाठी तसेच स्वतः मतदान करण्यासाठी शहरात येण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मारणेने प्रथम विशेष न्यायालयात केली होती. मात्र ती मागणी फेटाळल्यानंतर वकील विजयसिंह ठोंबरे यांच्या माध्यमातून त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली.
जामिनाच्या सर्व अटींचे पालन झाल्याचे लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने केवळ मतदानाच्या उद्देशाने दोन दिवसांसाठी पुण्यात येण्याची मर्यादित परवानगी दिली आहे. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडक नजर ठेवण्याचा निर्णय घेतला असून, निवडणूक काळात शांतता भंग झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस आयुक्तांनी दिला आहे. गुन्हे शाखेची विशेष पथके मारणेच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.

आणखी वाचा   शहराच्या सुरक्षेला नवे बळ