पुणे:



शहराला हादरवलेल्या स्वारगेट बलात्कार प्रकरणाला एक वर्ष पूर्ण झाले, तरीही अद्याप न्यायालयात आरोपीवर आरोप निश्चित झालेले नाहीत. आरोपी दत्तात्रय गाडे यांनी जामीन मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला असून, पुणे सत्र न्यायालयात निर्दोष मुक्ततेसाठीही अर्ज दाखल केला आहे. या अर्जांवर आदेश आल्यानंतरच खटल्याची सुनावणी सुरु होणार आहे.
प्रकरणाची पार्श्वभूमी
२५ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटे स्वारगेट आगारातील शिवशाही बसमध्ये आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय ३७, रा. गुनाट, शिरूर) यांनी तरुणीवर दोन वेळा बलात्कार केल्याचा आरोप केला गेला. घटना घडल्यावर आरोपी गावातील शेतात लपून बसला होता. पोलिसांनी त्याला अटक करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले, जिथे १२ दिवसांची कोठडी सुनावली गेली. नंतर आरोपीला येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले.
तपास आणि साक्षीदारांची नोंद
पुणे पोलिस तपास पथकाच्या ५२ दिवसांच्या कामगिरीत ८९२ पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकरणात एकूण ८२ साक्षीदारांची चौकशी झाली असून, पाच साक्षीदारांचे जबाब न्यायालयात नोंदवले गेले आहेत. १२ पंचनाम्यांमध्ये गुगल सर्च हिस्टरी, ध्वनी तीव्रता पडताळणी, ओळख परेड, सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शी निवेदने यांचा समावेश आहे.
सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अजय मिसार, तर पीडितेच्या वतीने ॲड. श्रीया आवले खटल्यात पक्ष मांडत आहेत.
आरोपीच्या जामीन आणि निर्दोष मुक्ती अर्जावर कार्यवाही
आरोपीचा जामीन अर्ज पुणे न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर आरोपीने ॲड. वाजेद खान बीडकर यांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला. तसेच सत्र न्यायालयात निर्दोष मुक्ततेसाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जांना पोलिस, सरकारी वकील आणि पीडितेच्या वकिलांनी विरोध दर्शवला आहे. न्यायालयाचे आदेश आल्यानंतरच आरोप निश्चितीची प्रक्रिया पुढे जाईल.
तपासातील ठळक निष्कर्ष
घटनास्थळी सापडलेले केस व शर्टाचे बटण रासायनिक तपासणीत आरोपीचेच असल्याचे निष्पन्न झाले.
पाच प्रत्यक्षदर्शींनी आरोपीला घटनास्थळी पाहिल्याचे सांगितले.
ससून रुग्णालयातील तीन तज्ज्ञ डॉक्टरांनी आरोपी लैंगिकदृष्ट्या सक्षम असल्याचा अहवाल दिला.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी घटनास्थळी उपस्थित असल्याचे स्पष्ट आहे.
मोबाइलच्या गुगल सर्च हिस्टरीमध्ये आरोपीने अश्लील व्हिडिओ पाहिल्याचे आढळले.
ओळख परेडमध्ये पीडितेने आरोपीची ओळख पटवली.
प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी न्यायालयाचे आदेश आणि आरोपीच्या अर्जांची कार्यवाही महत्त्वाची ठरणार आहे.

















