पुणे :



राज्यातील शालेय शिक्षण व्यवस्था अधिक पारदर्शक व तंत्रज्ञानाधारित करण्याच्या दृष्टीने ‘महा स्कूल जीआयएस मोबाइल ॲप प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटरने विकसित केलेल्या या ॲपच्या माध्यमातून शाळांचे भौतिक स्थान छायाचित्रांसह टॅग करून सर्व माहिती एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर संकलित केली जात आहे.
राज्यातील एकूण शाळांपैकी १ लाख ४ हजार ३६७ शाळांचे मॅपिंग पूर्ण झाले असून, अद्याप ३ हजार ७९८ शाळा नकाशावर नोंदल्या गेलेल्या नाहीत. या शाळांना मॅपिंग पूर्ण करण्यासाठी १० दिवसांची अंतिम मुदत देण्यात आली आहे.
शाळा प्रमुखांनी ॲपवर युडायस कोड किंवा नोंदणीकृत मोबाइल क्रमांकाद्वारे लॉगिन करून युडायस प्लसमधील माहिती पडताळून घ्यायची आहे. त्यानंतर शाळेचे अचूक GIS लोकेशन, शाळेची संपूर्ण इमारत, किचन शेड, मुला-मुलींसाठी स्वच्छतागृहे तसेच पिण्याच्या पाण्याच्या सुविधांचे फोटो अपलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही प्रक्रिया शाळेच्या आवारात उपस्थित राहूनच पूर्ण करावी लागणार आहे.
















