स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजप–राष्ट्रवादी आमनेसामने; टिंगरे यांचा अर्ज मुदत संपल्यानंतर दाखल

पुणे :

पुणे महानगरपालिकाच्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात थेट लढत रंगणार आहे. भाजपकडून श्रीनाथ भिमाले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून राष्ट्रवादीकडून सुहास टिंगरे रिंगणात उतरले आहेत. मात्र, टिंगरे यांनी अर्जाची मुदत संपल्यानंतर अर्ज सादर केल्याने निवडणूक प्रक्रियेत नवा पेच निर्माण झाला आहे.

स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी (दि. २३) सकाळी साडेअकरा वाजता होणार असून त्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची वेळ सकाळी ११ ते दुपारी १ अशी निश्चित करण्यात आली होती. मात्र, सुहास टिंगरे यांनी दुपारी १ वाजून १ मिनिटांनी अर्ज सादर केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांचा अर्ज ग्राह्य धरण्याबाबत अंतिम निर्णय पीठासीन अधिकाऱ्यांकडून घेतला जाणार आहे.

स्थायी समितीत एकूण १६ सदस्य असून त्यापैकी १२ सदस्य भाजपचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन, तर काँग्रेसचा एक सदस्य आहे. संख्याबळाच्या जोरावर भाजपचा दावा मजबूत मानला जात असला, तरी टिंगरे यांच्या अर्जावरील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, अध्यक्षपदाच्या निवडणुकीमुळे पालिकेच्या राजकारणात पुन्हा एकदा चुरस वाढली असून सोमवारी होणाऱ्या मतदानाकडे शहराचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा   भाजपमध्ये इनकमिंगला वेग ; माजी उपमहापौर दिलीप बराटे, माजी नगरसेवक अभिजीत शिवकर यांचा प्रवेश