पुणे –



पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (दि. १५ जानेवारी २०२६) सकाळी ७.३० वाजता मतदान प्रक्रियेला शांततेत सुरुवात झाली. शहरातील सर्व मतदान केंद्रांवर ईव्हीएम (EVM) यंत्रणा सुरळीतपणे कार्यान्वित असून मतदान प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याविना सुरू आहे.
सकाळच्या सत्रात ज्येष्ठ नागरिकांसह उत्साही मतदारांनी मतदान केंद्रांवर हजेरी लावली. काही केंद्रांवर पहाटेपासूनच मतदारांच्या रांगा दिसून आल्या. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व शिस्तबद्ध पार पडत असून आतापर्यंत कुठेही अनुचित प्रकार घडल्याची नोंद झालेली नाही.
प्राथमिक माहितीनुसार, सकाळी ७.३० ते ९.३० या दोन तासांत ६.३७ टक्के मतदान झाले. त्यानंतर सकाळी ९.३० ते ११.३० या कालावधीत मतदानाचा टक्का वाढून एकूण १४.९२ टक्के इतका नोंदविण्यात आला आहे.
दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत असून प्रशासनाने मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन केले आहे.
















