* १६५ जागांसाठी १,१६५ उमेदवार; मुस्लिम समाजातून केवळ २९ उमेदवार मैदानात



पुणे :
पुणे महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून, सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू केले आहे. १६५ जागांच्या या निवडणुकीत दोन जागा बिनविरोध झाल्याने उर्वरित १६३ प्रभागांसाठी मतदान होणार आहे. यंदा निवडणूक रिंगणात तब्बल १,१६५ उमेदवार उतरले असून, त्यामध्ये मुस्लिम समाजातील केवळ २९ उमेदवारांचा समावेश आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या तुलनेत मुस्लिम समाजाला पुरेसे राजकीय प्रतिनिधित्व मिळाले आहे का, हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
पुणे शहरातील एकूण मतदारसंख्येपैकी सुमारे २० टक्के मतदार मुस्लिम समाजाचे आहेत. मात्र उमेदवारीच्या वाटपात हे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी असल्याचे चित्र दिसून येत आहे. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत विविध पक्षांनी ५५ मुस्लिम उमेदवार दिले होते, त्यापैकी सहा उमेदवार विजयी झाले होते. त्या तुलनेत यंदा उमेदवारांची संख्या निम्म्याहूनही कमी झाल्याचे दिसते.
काँग्रेसकडून सर्वाधिक उमेदवारी
मुस्लिम समाजाला सर्वाधिक उमेदवारी देणारा पक्ष म्हणून यंदा काँग्रेस आघाडीवर आहे. काँग्रेसने एकूण १२ मुस्लिम उमेदवारांना संधी दिली आहे. विविध प्रभागांतून हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून, समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे.
राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे मर्यादित प्रतिनिधित्व
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून पाच तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) कडून चार मुस्लिम उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. शिवसेना (शिंदे गट) ने पाच उमेदवार दिले असून, ठाकरे गटाकडून केवळ एक उमेदवार मैदानात आहे.
भाजप आणि मनसेकडून अत्यल्प उमेदवारी
भारतीय जनता पक्षाने यंदा केवळ एकच मुस्लिम उमेदवार दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही फक्त एक उमेदवार निवडणुकीत उतरला आहे. त्यामुळे या पक्षांच्या भूमिकेवरही राजकीय व सामाजिक वर्तुळात प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
प्रतिनिधित्वावर टीका, पक्षांचे स्पष्टीकरण
एकूण पाहता, या निवडणुकीत काँग्रेस – १२, राष्ट्रवादी (अजित पवार) – ५, राष्ट्रवादी (शरद पवार) – ४, शिवसेना (शिंदे) – ५, भाजप – १, ठाकरे शिवसेना – १ आणि मनसे – १ असे एकूण २९ मुस्लिम उमेदवार आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार पुणे महापालिकेत किमान ३३ मुस्लिम नगरसेवक असणे अपेक्षित असल्याचे मत सामाजिक संघटनांकडून व्यक्त होत आहे.
नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी, “राजकीय पक्षांनी मुस्लिम समाजाला अधिक संधी देणे गरजेचे होते, मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही,” अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देताना स्थानिक नेतृत्व, कार्यक्षमता आणि सामाजिक संतुलनाचा विचार करण्यात आल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले असून, मजबूत स्थानिक नेतृत्व असलेल्या प्रभागांनाच उमेदवारी दिल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

















