पुण्यात काँग्रेस–भाजप आंदोलनानंतर  पोलिसांकडून कडक कारवाई

पुणे :

रविवारी काँग्रेस भवन परिसरात झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) आंदोलनादरम्यान परिस्थिती चिघळून दगडफेक झाली. या दरम्यान दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली आणि काही जण किरकोळ जखमी झाले. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, “आंदोलन हिंसक होईल, याची कोणतीही पूर्वकल्पना आम्हाला नव्हती. जर अशा गुप्त माहितीची माहिती असती, तर परवानगीच दिली नसती. भविष्यात राजकीय पक्षांच्या कार्यालयांवर किंवा नेत्यांच्या निवासस्थानावर अशा आंदोलनांना परवानगी दिली जाणार नाही.”
दोन्ही पक्षांवर गुन्हा
झटापटीनंतर भाजप शहराध्यक्ष व नगरसेवक धीरज घाटे, युवा मोर्चाचे पदाधिकारी दुष्यंत मोहोळ यांच्यासह ५०–६० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसकडूनही शहराध्यक्ष व नगरसेवक अरविंद शिंदे व इतर कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलीस तपासात दोषी आढळल्यास कायद्याअनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. त्यांनी काँग्रेसकडून पोलिसांवर केलेले आरोप फेटाळत सांगितले की, पोलीसांनी नियमानुसार आणि कायद्यानुसार कारवाई केली असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही.
जखमी आणि नुकसान
या घटनेत काँग्रेसचे तीन, भाजपचे दोन कार्यकर्ते तसेच दोन पोलीस आणि दोन पत्रकार किरकोळ जखमी झाले. आयुक्तांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे नमूद करत, भविष्यात अशा हिंसक आंदोलनांना रोखण्यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येईल, असे सांगितले.

आणखी वाचा   इंस्टाग्रामवरील ओळखीचा सापळा ठरला जीवघेणा; १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या