गुडलक चौकातील ‘कलाकार कट्टा’ जतन करावा– राष्ट्रवादीची महापालिकेला मागणी

पुणे :

शहरातील सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाणारे गुडलक चौकातील कलाकार कट्टा स्थलांतरित होऊ नये, अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
सोमवारी महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांना पक्षाच्या विरोधी पक्षनेते ॲड. निलेश निकम यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले. यावेळी पक्षाचे पालिकेतील गटनेते काका चव्हाण आणि नगरसेवक हर्षवर्धन मानकर उपस्थित होते.
राष्ट्रवादीने उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, तसेच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही यासंदर्भात निवेदन दिले आहे.
मानकर म्हणाले, “कलाकार कट्टा हा नवोदित तसेच ज्येष्ठ कलाकारांसाठी संवाद, सादरीकरण आणि विचारमंथनाचा महत्त्वाचा मंच राहिला आहे. साहित्य, नाट्य, संगीत आणि विविध कला क्षेत्रातील व्यक्तींना एकत्र आणणाऱ्या या ठिकाणाचे स्थलांतर करण्याऐवजी जतन करणे आवश्यक आहे.”
पुढे त्यांनी सांगितले, “पुण्याची सांस्कृतिक ओळख टिकवण्यासाठी आणि कलाकारांसाठी उपलब्ध असलेले हे महत्त्वाचे व्यासपीठ कायम राहावे. प्रशासनाने कलाकार कट्टा स्थलांतरित करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा.”

आणखी वाचा   पुणे महापालिका निवडणुकीत मुस्लिम प्रतिनिधित्वाचा मुद्दा ऐरणीवर