पुणे महापालिका निवडणुकीत भाजपचा ‘वंशपरंपरा फॉर्म्युला’

* कोट्यवधींची संपत्ती चर्चेचा विषय

पुणे :

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने माजी आमदार, खासदार, राज्यमंत्री तसेच त्यांच्या कुटुंबीयांना मोठ्या प्रमाणावर उमेदवारी देत ‘राजकीय वारसा’ पुढे नेण्यावर भर दिला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत अनुभवी नेत्यांबरोबरच त्यांच्या पुढील पिढीनेही थेट निवडणूक रिंगणात उडी घेतल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
भाजपकडून उमेदवारी मिळालेल्या अनेक उमेदवारांनी निवडणूक अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांमधून कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचा तपशील समोर आला आहे. यामध्ये माजी लोकप्रतिनिधींच्या मुला-मुली, सुना यांचा समावेश असून, श्रीमंत उमेदवारांची यादी विशेष चर्चेत आहे.
या उमेदवारांमध्ये वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बापूसाहेब पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांनी सर्वाधिक मालमत्तेच्या बाबतीत आघाडी घेतली आहे. सुरेंद्र पठारे यांच्या नावावर सुमारे २७१ कोटी ८५ लाख रुपयांची मालमत्ता असल्याची नोंद प्रतिज्ञापत्रात आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या कन्या सायली वांजळे यांच्याकडेही ७७ कोटी ६५ लाख रुपयांची मालमत्ता असल्याचे समोर आले आहे.
भाजपने पुणे महापालिकेच्या ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी उमेदवारी जाहीर केली असून, मित्रपक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) ला ९ जागा देण्यात आल्या आहेत. मात्र हे उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावरच निवडणूक लढवणार आहेत. याशिवाय इतर पक्षातील माजी नगरसेवक, पदाधिकारी तसेच आजी-माजी आमदारांच्या कुटुंबीयांनाही भाजपने संधी दिली आहे.
चारचाकी वाहनांच्या बाबतीतही सुरेंद्र पठारे यांची मालकी लक्षवेधी ठरली आहे. बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, इनोव्हा क्रिस्टा यांसारख्या आलिशान वाहनांचा त्यांच्या ताफ्यात समावेश आहे. पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण घेतलेल्या सुरेंद्र पठारे यांनी एम.टेक. पदवी संपादन केली असून, ही त्यांची पहिलीच निवडणूक आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरेंद्र पठारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या प्रवेशासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लक्ष घातल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर सुरेंद्र पठारे, त्यांची पत्नी ऐश्वर्या पठारे तसेच अन्य नातेवाईकांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत भाजपने इतर पक्षातून आलेल्या तब्बल २५ माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना उमेदवारी दिल्याने पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली आहे. मागील निवडणुकीत कामगिरी समाधानकारक नसलेल्या काही नगरसेवकांचे तिकीट कापून नव्याने आलेल्यांना संधी देण्यात आल्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, ‘प्रामाणिक कार्यकर्त्यांना हेच बक्षीस का?’ असा सवाल उपस्थित केला जात आहे.

आणखी वाचा   मेट्रोत अन्नपदार्थांवर कडक नियंत्रणकच्चे मांस-सुक्या मासळीला बंदी; नियमभंग केल्यास प्रवासच रद्द