पुणे महापालिकेत भाजपचा मोठा निर्णय ; ‘घराणेशाही’ला ब्रेक, कार्यकर्त्यांना दिलासा

पुणे :

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेतृत्वाने महत्त्वपूर्ण आणि धाडसी निर्णय घेतला आहे. आमदार, खासदारांच्या मुलांना तसेच जवळच्या नातेवाइकांना उमेदवारी न देण्याचा स्पष्ट आदेश पक्षाने दिल्याने शहरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे अनेक लोकप्रतिनिधींना धक्का बसला असला, तरी दीर्घकाळ पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
भाजपकडून पुणे महापालिकेच्या १६५ जागांसाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत तब्बल २,३०० पेक्षा अधिक इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज केले. त्याचबरोबर अन्य पक्षांतील सुमारे दहा माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने अंतर्गत स्पर्धा प्रचंड वाढली होती. त्यामुळे मूळ कार्यकर्त्यांना संधी मिळणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.
शहरातील काही आमदार आणि खासदारांनी आपल्या मुलांना व नातेवाइकांना उमेदवारी मिळावी, यासाठी दबाव वाढविला होता. संभाव्य प्रभागांची आखणी, विद्यमान व माजी नगरसेवकांच्या उमेदवारीवर गदा आणण्याचे प्रयत्नही सुरू होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या बैठकीतही या विषयावर चर्चा झाली होती. मात्र, अंतिम टप्प्यात पक्ष नेतृत्वाने स्पष्ट भूमिका घेत घराणेशाहीला थेट नकार दिला.
नुकताच हा निर्णय पुण्यात कळविण्यात आल्यानंतर अनेक वेळा निवडून आलेल्या माजी नगरसेवकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. काहींनी मुंबईत धाव घेऊन वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या, मात्र त्यातून फारसा परिणाम झाल्याचे दिसत नाही. कोथरूड, बिबवेवाडी, सातारा रस्ता, धनकवडीसह विविध भागांत तयारी करणाऱ्या ‘विशेष’ उमेदवारांना या निर्णयाचा फटका बसला आहे.
दरम्यान, राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या मुलीच्या उमेदवारीबाबत चर्चा झाली असली, तरी त्यांनी स्वतः नकार देत पक्षातील कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशी भूमिका घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे पक्षातील बैठकीत काही काळ वादाचे वातावरण निर्माण झाल्याचीही माहिती आहे.
यापूर्वी नगर परिषद निवडणुकांत घरातील सदस्यांना उमेदवारी दिल्याने भाजपला काही ठिकाणी फटका बसला होता. त्या अनुभवातून धडा घेत महापालिका निवडणुकीसाठी ‘नातेवाईकांना तिकीट नाही’ हा निर्णय घेण्यात आला आहे. गुजरात आणि दिल्ली महापालिकेत यशस्वी ठरलेल्या या प्रयोगाची पुण्यात अंमलबजावणी होत असल्याने, आगामी निवडणूक अधिक चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत.

आणखी वाचा   विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार