पठारे कुटुंबातील भाजप प्रवेशाने राष्ट्रवादीची गणिते बिघडली

* वडगावशेरीत महापालिका निवडणुकीपूर्वी राजकीय भूकंप

पुणे –

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ, जो एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता, तो पुन्हा एकदा राज्यातील सर्वाधिक चर्चेचा राजकीय केंद्रबिंदू ठरला आहे. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपने या मतदारसंघावर वर्चस्व मिळवत २४ पैकी १४ जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसला सहा, शिवसेनेला तीन तर एमआयएमला एक जागा मिळाली होती. त्यानंतरच्या कालखंडात या मतदारसंघातील राजकीय समीकरणे सातत्याने बदलत गेली.

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केलेले बापूसाहेब पठारे विजयी झाले. राष्ट्रवादी (अजित पवार) विरुद्ध राष्ट्रवादी (शरद पवार) अशी थेट लढत झालेल्या या निवडणुकीत पठारे यांच्या विजयामुळे वडगावशेरी पुन्हा राष्ट्रवादीकडे येईल, अशी अपेक्षा निर्माण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाने गेल्या सहा महिन्यांपासून महापालिका निवडणुकीची रणनीती आखण्यास सुरुवात केली होती.

भाजपची ‘मास्टरस्ट्रोक’ खेळी

मात्र, उमेदवारांच्या मुलाखती सुरू असतानाच भाजपने मोठी खेळी करत आमदार बापूसाहेब पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे यांना पक्षात प्रवेश दिला. केवळ इतकेच नव्हे, तर सुरेंद्र पठारे यांच्यासह त्यांच्या पत्नी ऐश्वर्या पठारे आणि नातेवाईक असलेल्या आणखी एका व्यक्तीला भाजपने उमेदवारी दिली. या निर्णयामुळे आमदार पठारे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका निवडणूक लढवण्याचे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे स्वप्न धुळीस मिळाले.

या घडामोडींमुळे वडगावशेरीत भाजपची ताकद वाढली असून राष्ट्रवादी गोटात अस्वस्थता पसरली आहे. विशेष म्हणजे, विद्यमान आमदार बापूसाहेब पठारे हे शरद पवार गटाचे असतानाही, त्यांच्या पक्षाकडून या संपूर्ण मतदारसंघात ‘तुतारी वाजविणारा माणूस’ या चिन्हावर केवळ एकच उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. त्यामुळे आमदार पठारे यांची निवडणुकीतील भूमिका नेमकी काय असेल, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

आणखी वाचा   स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश