शिवसेना स्वबळावर मैदानात ; पुणे महापालिका निवडणुकीसाठी ११० उमेदवारांची यादी जाहीर

पुणे :

पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेना अखेर स्वबळावर उतरल्याचे निश्चित झाले असून, निवडणूक रिंगणात आता ११० उमेदवार आहेत. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “शिवसेनेने सुरुवातीला १२३ उमेदवारांना निवडणूक अर्जासाठी ‘एबी’ फॉर्म दिले होते. मात्र विविध कारणांमुळे १० ते १२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतला, त्यामुळे आता निवडणूक रिंगणात ११० उमेदवार आहेत.”
शिवसेना येत्या काळात पुणे शहरासाठी ‘वचननामा’ जाहीर करणार आहे. या दस्तऐवजात शहराच्या सर्वांगीण विकासाची भूमिका आणि पुढील पाच वर्षांचा विकास आराखडा समाविष्ट असेल. प्रचाराची सुरुवात शनिवारी (ता. ३) उद्योग मंत्री उदय सामंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाने करणार आहेत.
युती का झाली नाही, याबाबत विचारले असता डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “शिवसेना आणि भाजप यांची युती व्हावी, ही आमची इच्छा होती. काही ठिकाणी तडजोड करण्याची तयारी होती, पण पुढे प्रगती झाली नाही. भूतकाळाच्या घटनांवर भाष्य करण्यापेक्षा नगर विकास विभागाच्या माध्यमातून पुण्यात केलेली विकासकामे मांडण्यात येतील.”
पुणे व पिंपरी-चिंचवडमधील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ९ जानेवारीला पुण्यात जाहीर सभा आयोजित करणार आहेत.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांबाबत विचारले असता डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “मतदार स्वतः निर्णय घेतील. कोणाला उमेदवारी द्यायची, याची अंतिम जबाबदारी पक्षांची आहे.”

आणखी वाचा   २३ समाविष्ट गावांसाठी दोन हजार कोटींचे कर्ज; पाणी व सांडपाणी प्रकल्पांना गती