* पूर्व पुण्यातील निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे



पुणे :
पूर्व पुण्यातील वडगाव शेरी परिसरातून एक उच्चशिक्षित आणि सामाजिक कार्यात सक्रिय दांपत्य – सुरेंद्र पठारे आणि ऐश्वर्या पठारे – पुणे महापालिका निवडणुकीच्या रणांगणात उतरल्याने राजकीय वातावरणात चर्चेला उधाण आले आहे. दोघेही भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवत असून, सुरेंद्र पठारे प्रभाग क्रमांक ४ तर ऐश्वर्या पठारे प्रभाग क्रमांक ३ मधून मतदारांसमोर उभे राहिले आहेत.
सुरेंद्र पठारे हे COEP (कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे) चे गोल्ड मेडलिस्ट असून, अलीकडेच त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. पक्षाच्या तज्ज्ञांकडून त्यांना पूर्व पुण्यातील विकासासाठी सक्षम, अभ्यासू आणि तरुण नेतृत्व मानले जात आहे. स्थानिक नागरिकांचा विश्वास आहे की सुरेंद्र पठारे यांच्या नेतृत्वात प्रभागाचा विकास वेगाने होईल.
त्यांच्या पत्नी ऐश्वर्या पठारे सामाजिक कार्यात आणि महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत. ‘सखी प्रेरणा मंच’ या व्यासपीठाद्वारे त्यांनी महिलांसाठी अनेक कार्यक्रम राबवले आहेत. याशिवाय त्यांनी जेजुरी हरिद्रा मार्तंड पूजा आयोजित करून धार्मिक तसेच सामाजिक एकतेचे प्रतिक साकारले आहे. ऐश्वर्या पठारे यांचा या उपक्रमांमुळे सामाजिक कार्यकर्त्या म्हणून प्रभाव वाढला आहे.
राजकीय विश्लेषकांचे मत आहे की, अभ्यासू तांत्रिक पार्श्वभूमी असलेले सुरेंद्र पठारे आणि सामाजिक जाणीव व उद्योजकीय दृष्टिकोन असलेली ऐश्वर्या पठारे हे दांपत्य पूर्व पुण्यातील निवडणुकीत रंगतदार स्पर्धा निर्माण करणार आहेत. उच्चशिक्षित, तरुण आणि विकासाभिमुख नेतृत्वाकडे मतदार कसे पाहतात, याकडे आता संपूर्ण पुण्याचे लक्ष लागले आहे.

















