पुणे:



माई पब्लिकेशन्स आयोजित आणि सुरेश भट गझलमंच, पुणे प्रस्तुत ‘गझलरंग’ या दर्जेदार मराठी गझल मुशायऱ्याच्या निमित्ताने गझलकार सुधीर मुळीक यांच्या पहिल्या गझलसंग्रह ‘सदरा कफल्लकाचा’ चे प्रकाशन एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ,पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. साहित्यप्रेमी, गझलकार, कवी आणि रसिकांच्या मोठ्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याने मराठी गझलविश्वात विशेष उत्सुकता निर्माण केली.
पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ कवी किशोर कदम (सौमित्र) यांच्या हस्ते झाले. यावेळी उर्दू गझलकार, अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि सह आयुक्त मोनिका सिंग ,दगडूदादा लोमटे (अंबेजोगाई) तसेच सप्तसिंधू महिला आधार, बालसंगोपन व शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा ममता सिंधुताई सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
मोनिका सिंह यांनी मनोगत व्यक्त करताना सुधीर मुळीक यांच्या गझललेखनातील सातत्य, आशयघनता आणि संवेदनशील अभिव्यक्तीचे कौतुक केले. त्यांच्या गझलांमध्ये मानवी अनुभव, सामाजिक वास्तव आणि भावनिक जाणिवांचे प्रभावी चित्रण आढळते, असे त्या म्हणाल्या. किशोर कदम यांनी कविता आणि गझल या केवळ साहित्यप्रकार नसून माणसाच्या जगण्याचा आणि भावविश्वाचा दस्तऐवज असल्याचे सांगत सुधीर मुळीक यांच्या लेखनातील प्रामाणिकपणाचे कौतुक केले.

















