पुणे:



शहरातील बुधवार पेठ परिसरातील ‘डिस्को’ व ‘माचिस’ (मॅचबॉक्स) इमारतींमध्ये सुरू असलेल्या देहविक्री रॅकेटवर पोलिसांनी मध्यरात्री मोठी कारवाई करत १८ जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवारी रात्री अकरा वाजल्यापासून मंगळवारी पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू होती.
पोलिसांनी छापा टाकला असता, दोन्ही इमारतींमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे उघड झाले. या कारवाईत एकूण ११ महिलांना देहविक्री करताना पकडण्यात आले असून त्यामध्ये १५ वर्षे ४ महिन्यांची अल्पवयीन मुलगी असल्याचे निष्पन्न झाले. संबंधित मुलीला जबरदस्तीने या व्यवसायात ढकलण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
तपासादरम्यान ताब्यात घेतलेल्या १८ जणांमध्ये ११ महिला, ४ पुरुष आणि १ बालकाचा समावेश आहे. यापैकी १५ जण बांगलादेशी नागरिक असल्याचे समोर आले असून ते भारतात अनधिकृतपणे वास्तव्यास असल्याची शक्यता आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार सुमित मिलिंद चव्हाण (३३, रा. मंगळवार पेठ, पुणे) असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याच्या मदतीला ज्योती उर्फ सबिना शेख ( ४०) ही काम पाहत होती.
तसेच राहुल शर्मा ( २४) व समीर हलवदार ( २९) हे व्यवस्थापक म्हणून काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. छाप्यात पोलिसांनी आरोपींकडून मोबाईल फोन, व्यवहारांच्या नोंदी असलेल्या डायऱ्या जप्त केल्या आहेत. या माध्यमातून ग्राहकांची माहिती, पैशांचे व्यवहार आणि रॅकेटचे विस्तृत जाळे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणी संबंधितांविरुद्ध मानवी तस्करी, अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक कायदा तसेच परकीय नागरिक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

















